जिद्दीपुढे गगन ठेंगणे...! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - मनात जिद्द असेल, तर सारं काही शक्‍य आहे. जन्माने दिव्यांग असलेली अर्चना तिमराजू ही कला शिक्षिका आहे. "आम्हीही सर्वसामान्यांसारखेच आहोत,' हाच संदेश घेऊन ती बाइकवरून भारतभ्रमणाला निघाली आहे. 

पुणे - मनात जिद्द असेल, तर सारं काही शक्‍य आहे. जन्माने दिव्यांग असलेली अर्चना तिमराजू ही कला शिक्षिका आहे. "आम्हीही सर्वसामान्यांसारखेच आहोत,' हाच संदेश घेऊन ती बाइकवरून भारतभ्रमणाला निघाली आहे. 

बंगळूर ते लेह आणि लेह ते बंगळूर अशा तीस दिवसांच्या "सायलेंट एक्‍स्पिडिशन' मोहिमेचा म्हणजेच "जर्नी टू इन्स्पायर'चा दिव्यांगांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे. आठ हजार किलोमीटरच्या या मोहिमेत तिला साथ देतोय तिचा शिक्षक सहकारी डॅनिअल सुंदरम. दोघांचे वय 33 वर्षे असून 29 एप्रिलला ते दोघे बंगळूरहून मोटारसायकलवर प्रवासाला निघाले आहेत. दररोज साधारणत- चारशे ते साडेचारशे किलोमीटरचा प्रवास ते मोटारसायकलवरून करत आहेत. दोघेही बंगळूर येथे माल्याआदिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक आहेत. गुरुवारी (ता. 3) "सकाळ' कार्यालयाला दोघांनी सदिच्छा भेट दिली, त्या वेळी त्यांनी मोहिमेचा उद्देश सांगितला. याप्रसंगी दीप ग्लोबल सोसायटीचे सचिव व इंडिया डेफ सोसायटीचे खजिनदार धनंजय जगताप, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई उपस्थित होते. 

मोटारसायकलवर फिरण्याची आवड असलेल्या अर्चनाने देशभर फिरून केवळ दिव्यांगांपर्यंतच नव्हे, तर समस्त भारतीयांपर्यंत दिव्यांगांच्या अंतर्मनातला आवाज पोचविण्याचे ठरविले आहे. "मास्टर्स ऑफ व्हिज्युअल आर्टस्‌ इन स्कल्पचर्स' पदवी संपादन केलेली अर्चना पीएच.डी. करीत आहे. 

दिव्यांग कलेतूनही व्यक्त होऊ शकतात. संवाद साधणे हे आमच्यासाठी कौशल्याचे असते. मूकबधिर व्यक्तींना जगातील घडामोडी समजाव्यात, यासाठी त्यांच्या सांकेतिक भाषेतून दररोज घडणाऱ्या घडामोडींची माहिती वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दिव्यांगांच्या मोटारसायकलवर लावण्यासाठी स्वतंत्र लोगो तयार करून द्यायला हवा.'' 
- अर्चना तिमराजू 

दिव्यांग कोणावर अवलंबून नाहीत, तेही त्यांच्या पायावर उभे राहू शकतात. त्यांच्यासाठीही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. स्त्री-पुरुष समानतेचा विचार करताना दोघांनाही विविध क्षेत्रांत समान संधी असाव्यात, हेच या मोहिमेतून सांगण्याचा आमचा प्रयत्न राहील. 
- डॅनिअल सुंदरम 

Web Title: bike rider archana timraju daniel sundaram