पुण्यात जैव वैद्यकीय कचऱ्याचे होणार संकलन

अविनाश पोफळे
रविवार, 21 मे 2017

महापालिकेकडून या अभियानाच्या उद्‌घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. त्यासाठी जनजागृतीपर पत्रकेही तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याद्वारे जैव वैद्यकीय कचरा आरोग्य विभागाकडे देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. 

पुणे - तुमच्या घरात सलाईनच्या बाटल्या, रुग्णासाठी वापरलेल्या इंजेक्‍शनच्या सुया, वैधता संपलेली औषधे आदी जैव वैद्यकीय कचरा आहे. मात्र, तुम्ही त्याची विल्हेवाट लावण्याच्या चिंतेत असल्यास काळजी करू नका. कारण, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने महापालिकेतर्फे जैव वैद्यकीय संकलन, जनजागृती आणि विल्हेवाट अभियान प्रभाग क्रमांक 13 मध्ये लवकरच सुरू करण्यात येत आहे. अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच अभियान असल्याचा महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याचा दावा आहे. 

महापालिका, गोल्डन ग्रुप, क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कमिन्स इंडियातर्फे हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचा आरोग्य विभाग आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 

अभियानाच्या सुरवातीला घरोघरी जाऊन रुग्णांची संख्या, त्यांचा आजार, उपचारपद्धती, संबंधित रुग्णालय आदींवर सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याची तयारी आरोग्य विभागाकडून सुरू आहे. जैव वैद्यकीय कचऱ्यात सलाईनच्या बाटल्या, औषधांची पाकिटे, वैधता संपलेली औषधे, इंजेक्‍शनची सुई आदी वस्तूंचा समावेश आहे. 

महापालिकेकडून या अभियानाच्या उद्‌घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. त्यासाठी जनजागृतीपर पत्रकेही तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याद्वारे जैव वैद्यकीय कचरा आरोग्य विभागाकडे देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. 

"नागरिकांनी दैनंदिन कचऱ्यात जैव वैद्यकीय कचरा टाकल्याने, त्यातील धोकादायक वस्तूंचा संसर्ग कचरा वेचकांना होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. म्हणून हा प्रकल्प सुरू करीत आहोत. त्यासाठी गोल्डन ग्रुपने सी.एस.आर. अंतर्गत वाहनाचीही सोय केली आहे. येत्या पंधरा दिवसांत हे अभियान सुरू होईल,'' अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. 

Web Title: Bio-medical waste will be collected in Pune