बायो-रिफायनरीमधून जैवइंधन - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

पुणे - ‘शेतीतील कचऱ्यापासून इथेनॉल या जैविक इंधनाची निर्मिती ‘बायो-रिफायनरी’ तंत्रज्ञानाद्वारे केली जाणार आहे. शेतीमधील विविधता ही काळाची गरज असून, या तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीतील कचऱ्यातून शेतकऱ्यांना महसूल उपलब्ध होऊ शकणार आहे,’’ असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

‘प्राज इंडस्ट्रीज’च्या ‘सेकंड जनरेशन इंटिग्रेटेड बायो-रिफायनरी डेमान्स्ट्रेशन प्लांट फॉर रिन्युवेबल फ्युएल्स अँड केमिकल्स’ प्रकल्पाचे उद्‌घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक राजेश पांडे, ‘प्राज इंडस्ट्रीज’चे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी या वेळी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, ‘‘जैविक इंधनासंदर्भात व्यापक आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या इंधननिर्मितीसाठी बायो-रिफायनरी प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन आणि विकास यामध्ये सातत्य ठेवून इतर पारंपरिक इंधने आणि रसायनांची निर्मिती करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. शेतीतील कापसाचे देठ, उसाचा चोथा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टाकाऊ कचऱ्यापासून दरवर्षी जवळपास एक दशलक्ष लिटर इथेनॉल या तंत्रज्ञानाच्या साह्याने तयार करणे शक्‍य आहे.’’

चौधरी म्हणाले, ‘‘ऊर्जानिर्मिती क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करण्याची क्षमता बायो-रिफायनरी या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामध्ये आहे. शेतीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो.’

Web Title: Biofuel from bio-refinery