जैववैद्यकीय कचऱ्यातून आता उत्पन्नाचा स्रोत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

पिशव्यांद्वारे ओळख
रोगजंतू, विषाणूंमुळे जैववैद्यकीय कचरा अतिघातक असल्याने त्याची शास्त्रीय दृष्टीने विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे वर्गीकरण केले जाते. तो ओळखण्यासाठी पिवळ्या, लाल व पांढऱ्या रंगांच्या पिशव्यांचा वापर केला जातो. ज्वलनशील कचऱ्यासाठी पिवळ्या, पुनर्वापर व नष्ट होण्यायोग्य कचऱ्यासाठी लाल आणि काच व धारदार वस्तूंसाठी पांढऱ्या पिशव्या वापरल्या जातात.

पिंपरी - महापालिकेचे दवाखाने व रुग्णालयांत निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची विक्री करून उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण केला जाणार आहे. त्यासाठी कचऱ्याच्या वर्गवारीनुसार निविदा प्रक्रिया राबविली. त्याला प्रतिसाद देत एका कंपनीने प्रतिकिलोचे दर महापालिकेला कळविले आहे. 

महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत दवाखाने व रुग्णालयांना वैद्यकीय साहित्याचे वितरण केले जाते. त्याचा वापर झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विक्री करण्याचे नियोजन आहे. यात रिकाम्या काचेच्या बाटल्या, सलाईन, इंजेक्‍शन, प्लॅस्टिक बाटल्या, डबे, पुठ्ठा किंवा कागदी खोकी, पत्र्याचे डबे, प्लॅस्टिक जार, हायपोसोल्युशन, थर्मोकॉलचे बॉक्‍ट, खराब क्ष-किरण फिल्म्स (एक्‍सरे) आदी 

साहित्यांचा समावेश आहे. त्याची विक्री करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्याला ट्रिनिटी एंटरप्रायझेस कंपनीकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी कचऱ्याच्या वर्गीकरणानुसार खरेदी दर कळविले आहेत. 
त्यांना दोन वर्षांसाठी कचरा घेण्यास परवानगी देण्याचा ठराव विधी समितीने मंजूर केला आहे. ट्रिनिटीने काचेच्या रिकाम्या व प्लॅस्टिक बाटल्या अनुक्रमे दोन व बारा रुपये, पुठ्ठ्याची खोकी पावणेसहा रुपये, पत्र्याचे डबे अकरा रुपये, लाकडी खोकी सव्वा रुपया, एक व पाच लिटर प्लॅस्टिक जार अनुक्रमे २० व २४ रुपये, हायपोसोल्युशन ३८ रुपये, थर्मोकॉल बॉक्‍स दीड रुपया आणि खराब क्ष-किरण फिल्म्स ३० रुपये किलोप्रमाणे घेण्यास तयारी दर्शविली आहे.

सद्य:स्थिती व विल्हेवाटीची प्रक्रिया
शहरात महापालिकेची आठ रुग्णालये, आठ प्रसूतिगृहे, एक रक्तपेढी, एक शवविच्छेदन केंद्र, नऊ कुटुंब कल्याण केंद्र व काही दवाखाने आहेत. यात संत तुकारामनगरमधील वायसीएम, पिंपरीतील जिजामाता, चिंचवडचे तालेरा, भोसरीचे जुने व नवीन मल्टिस्पेशालिटी, यमुनानगर, आकुर्डी, थेरगाव, जुनी सांगवी रुग्णालयांचा समावेश आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचा जैववैद्यकीय कचरा दररोज निर्माण होतो. त्याचे विभक्तीकरण (अलगीकरण), संकलन, वाहतूक करून प्रक्रिया करण्याचे व विल्हेवाट लावण्याचे काम महापालिका 
करीत आहे. 

हा कचरा आरोग्यासाठी हानिकारक असल्याने त्याची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावण्यासाठी वायसीएम रुग्णालयाच्या आवारात प्रकल्प उभारला आहे. सध्या जैववैद्यकीय कचरा जाळणे व निर्जंयुकीकरण करणे अशा पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. रुग्णालये व दवाखान्यांमधील कचरा गोळा करण्यासाठी चार वाहने आहेत.

दरवर्षी वाढतोय जैववैद्यकीय कचरा
वर्ष              कचरा (टनामध्ये)

२०१५-१६         ३७६
२०१६-१७         ४२२
२०१७-१८         ४९६


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biomedical Garbage income source

टॅग्स