पेन्शनसाठी हवी बायोमेट्रिक नोंदणी

गजेंद्र बडे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - खासगी कंपन्या, महामंडळे आणि निमसरकारी संस्थांमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या नूतनीकरणासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे आता हयातीचा दाखला सादर करावा लागणार नाही. या दाखल्याऐवजी बायोमेट्रिक पद्घतीने नोंदणी करणे आवश्‍यक आहे. निवृत्तिवेतन धारकांना नोंदणीकृत नागरी सुविधा केंद्रात किंवा टपाल कार्यालयात जाऊन याची नोंदणी करावी लागणार आहे.  

दरवर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत ही नोंदणी करणे अनिवार्य असते, तरच पेन्शनचे नूतनीकरण होते.

नूतनीकरणाअभावी पेन्शन बंद होते. मात्र, यंदा नूतनीकरणाअभावी ३१ डिसेंबरपर्यंत कोणाचेही पेन्शन बंद केले जाणार नसल्याचे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून सांगण्यात आले. पूर्वीच्या प्रचलित पद्धतीनुसार हयातीचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) सादर करावा लागत असे; परंतु आता या दाखल्याऐवजी बायोमेट्रिक प्रणालीत नोंदणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. 

बायोमेट्रिक नोंदणीची जबाबदारी खरेतर बॅंकांची आहे. त्यानुसार काही बॅंकांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, याला काही बॅंका अपवादही आहेत. ही सुविधा उपलब्ध करून न दिलेल्या बॅंकांमधील पेन्शनधारकांची बायोमेट्रिक नोंदणीसाठी मोठी परवड होऊ लागली आहे. त्यांची ही परवड थांबविण्यासाठी पीएफ कार्यालयाच्या आवारात फक्त दहा रुपयांत नोंदणी करण्याची सोय करण्यात आली आहे. 

बायोमेट्रिक नोंदणीसाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरी सुविधा केंद्र किमान १०० रुपये शुल्क आकारत आहेत. हीच नोंदणी पीएफ कार्यालयाच्या आवारातील व्यक्तीकडून केवळ दहा रुपयांत करण्यात येत आहे. त्यासाठी पुण्यात येऊन मी नोंदणी केली आहे. 
- उत्तम निगडे, नीरा, ता. पुरंदर

पुण्यात एक लाख पेन्शनधारक 
सध्या पुणे शहर व जिल्ह्यात मिळून सुमारे एक लाख सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनधारक आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये शैक्षणिक संस्था, प्रसारमाध्यमे, सामाजिक संस्था, औद्योगिक कंपन्या आणि राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या जास्तीच्या वयामुळे अंगठ्याचे ठसे आणि डोळ्यांच्या प्रतिमा (इमेज) बायोमेट्रिक प्रणालीत नोंदल्या जात नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या पद्धतीनुसार वैद्यकीय अधिकाऱ्याचा हयातीचा दाखला सादर करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 

काही सेवानिवृत्त कर्मचारी बेडवर पडून आहेत. त्यांना उठता- बसताही येत नाही. हे कर्मचारी या बायोमेट्रिक नोंदणीसाठी घराबाहेर पडू शकत नाहीत, त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक नोंदणी त्यांच्या घरी जाऊन केली जाणार आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये पीएफ कार्यालयातील कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन नोंदणी करतील.  
- एम. आर. जाधव, सहायक आयुक्त, (भविष्य निर्वाह) प्रादेशिक कार्यालय, पुणे 

Web Title: Biometric Registration for Pension