खुल्या कारागृहाच्या आवारात सुगरण पक्ष्यांची वसाहत (व्हिडिओ)

दिलीप कुऱ्हाडे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

येरवडा (पुणे) : येरवडा महिला खुल्या कारागृहाच्या आवारात सुगरण पक्ष्यांची वसाहत तयार करण्यासाठी लगबग सुरू आहे. सुगरण नरपक्षी सुंदर घरटं विणण्यात दंग आहे. तर काही नरपक्षी तयार केलेल्या घरट्यांवर बसून पंख फडकवून मोठमोठ्याने चिवचिवाट करत मादीला घरट्याची निवड करण्याठी बोलावित असल्याचे दृश्‍य मन मोहून घेत आहे.

येरवडा (पुणे) : येरवडा महिला खुल्या कारागृहाच्या आवारात सुगरण पक्ष्यांची वसाहत तयार करण्यासाठी लगबग सुरू आहे. सुगरण नरपक्षी सुंदर घरटं विणण्यात दंग आहे. तर काही नरपक्षी तयार केलेल्या घरट्यांवर बसून पंख फडकवून मोठमोठ्याने चिवचिवाट करत मादीला घरट्याची निवड करण्याठी बोलावित असल्याचे दृश्‍य मन मोहून घेत आहे.

चिमणीच्या आकाराच्या या नाजूक व सुंदर सुगरण पक्ष्यांनी सिमेंटच्या जंगलात सुद्धा अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या येरवडा महिला खुल्या कारागृहाच्या आवाराची निवड केली आहे. बाभुळाच्या झाडांवर काही सुगरण नरपक्ष्यांनी सुंदर अशी घरटी विणली आहेत. तर काही घरटे विणण्याच्या कामात व्यस्त आहेत. घरटे विणलेल्या पक्षी पंख फडकवून मोठमोठ्याने चिवचिवाट करत मादीला घरट्याची निवड करण्याठी बोलावित आहेत. त्यांच्या या चिवचिवाटमुळे संपूर्ण परिसर गजबजुन गेला आहे.

या संदर्भात बोलताना पक्षीमित्र दिपक शिंदे म्हणाले, ‘‘ सुगरण नरपक्षी विणलेल्या सुंदर घरट्यावर बसून पंख फडकवून चिवचिवाट करत मादीला घरघट्याची निवड करण्यास बोलवितो. जर मादीला घरटे पसंत पडले तर ठिक नाही तर तो लगेच दुसरे घरटे विणण्यास सुरवात करतो. घरटे विणताना शिंदीच्या पानाचे धागे, गवत यांचा वापर हा पक्षी करतो. घरटे वाऱ्याने आडवे होऊ नये म्हणून घरट्यांत ओली मातीही चिकटवून ठेवतो. बहुेतक सुगरण पक्ष्यांची घरटी बाभुळ व शिंदीच्या झाडांवरच आढळतात.क्वचित विजेच्या तारांवर सुद्दा सुगरण पक्षी नेहमी गटागटाने घरटी विणतात.’’

एकाच पद्धतीने विनणेली ही सुरेख घरटी झाडांच्या फांद्यांवर लोंबकळलेली दिसतात. लोंबकळणारा वरचा भाग झाडाच्या फांदीला घट्ट बांधलेला असतो आणि मध्ये जो गोलाकार भाग दिसतो तो घरट्याची मुख्य जागा. घरट्याच्या खालच्या भागातूनच हे पक्षी प्रवेश करतात. पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अलींना अशा एकाखाली एक जोडलेली सुगरण पक्ष्यांच्या घरट्यांची एक सातमजली इमारत आढळल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सुगरण पक्ष्यांनी विणलेल्या घरट्यांखाली पाणी व दलदल
महिला खुल्या कारागृहाच्या आवारात असलेल्या बाभळीच्या झाडांवर शेकडो सुगरण पक्ष्यांनी विणलेल्या घरट्यांखाली मोठ्या प्रमाणात दलदल व पाणी आहे. त्यामुळे पिल्लांची सुरक्षितता व पिल्लांसाठी मुबलक खाद्य असल्यामुळेच या जागेची निवड केली असल्याचे दिपक शिंदे यांनी सांगितले.

Web Title: bird nest at yerwawada jail in pune