मुक्‍या जिवांसाठी "मूठभर धान्य, ओंजळभर पाणी'

वैशाली भुते
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

पिंपरी - वाढते प्रदूषण, शहराच्या चारही दिशेने उभारणारे कॉंक्रीटचे जंगल आणि झपाट्याने घटणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली जाते.

मात्र, "सोशल ऍक्‍शनिस्ट फाउंडेशन'ने या संवर्धनाला थेट कृतीची जोड दिली आहे. "मूठभर धान्य, ओंजळभर पाणी' या संकल्पनेअंतर्गत फाउंडेशनने शहरातील चौकाचौकांत पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या काही दिवसांत पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात एकूण दहा हजार पाणवठे तयार करण्याचे संस्थेचे उद्दीष्ट आहे.

सोशल ऍक्‍शनिस्ट फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहे. गेल्या काही दिवसांत पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे फाउंडेशनच्या निदर्शनास आले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिनेश तळेकर आणि सहकाऱ्यांनी पक्षी संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच त्यांनी "मूठभर धान्य, ओंजळभर पाणी' या संकल्पनेची आखणी केली. गेल्या वर्षभरात पुणे शहरातील अनेक चौकांत त्यांनी हा उपक्रम राबविला. त्याअंतर्गत चौकांच्या ठिकाणी पक्षी तसेच नागरिकांचे लक्ष वेधले जाईल, अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या दोन तबकड्या लटकविल्या. त्यातील एकात धान्य आणि दुसरीत पाणी भरून ठेवले. त्याला आतापर्यंत पुणेकरांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून फाउंडेशनने तो पिंपरी- चिंचवड शहरातही राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जगताप डेअरी, पिंपळे सौदागर परिसरातील काही चौकांमध्ये हे पाणीसाठे तयार केले आहेत.

नागरिकांचा सहभाग वाढावा - तळेकर
चौकांच्या ठिकाणी पाणीसाठे तयार करण्यामागे जनजागृती हा उद्देश आहे. या पुढील टप्प्यात नागरिकांनी या पाणीसाठ्याच्या ठिकाणी पक्ष्यांसाठी मूठभर धान्य आणि ओंजळभर पाण्याची सोय करणे अपेक्षित आहे.

त्यातूनच ही संकल्पना अधिक खोलवर रुजेल. सोसायट्यांमध्ये पाणी साठविण्याच्या भांड्याचे वाटप करून सोसायटी सभासदांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या काही दिवसांत आठ ते दहा हाउसिंग सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती केली आहे. पक्षी हे निसर्गाचे आधारस्तंभ आहेत. हे अनमोल पक्षी जिवंत राहिले नाही, तर निसर्ग किती भयावह दिसेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. ही संकल्पना यशस्वी झाल्यास ही दोन्ही शहरे जागतिक पातळीवर पक्ष्यांचे शहर "सिटी ऑफ बर्ड' म्हणून ओळखले जातील. सामाजिक प्रश्‍नांना कृतीशीलतेची जोड देणे गरजेचे आहेच. मात्र, नवीन संकल्पना आखणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे सोशल ऍक्‍शनिस्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिनेश तळेकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Web Title: bird saving