बर्ड व्हॅली की बदनाम व्हॅली?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पिंपरी - महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून संभाजीनगरमध्ये बर्ड व्हॅलीसारखे शहरातील उत्कृष्ट असे पर्यटन केंद्र विकसित केले आहे. परंतु, हे पर्यटन केंद्र गैरप्रकारांमुळे बदनाम होत आहे. ते रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिस यंत्रणेने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महापालिका ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा व नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे. 

उद्यानातील खाणीच्या तलावात मागील आठवड्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. यापूर्वी अनेकवेळा या उद्यानातील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, वारंवार अशा घटना घडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. उद्यानातील साधनांची दुरवस्था झालेली असून, या ठिकाणी महापालिकेमार्फत देखभाल-दुरुस्ती, सुरक्षेचे काम ठेकेदारांना दिलेले आहे. मात्र, हे ठेकेदार देखभाल व दुरुस्तीचे काम पैसे घेऊनही नीट करत नसल्याने उद्यानाची परिस्थिती बिकट झाली आहे. उलट उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना येथील ठेकेदारी कर्मचाऱ्यांकडून अरेरावी केली जाते. 

जुन्या खाणीचा योग्य वापर करीत महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून या भागाचे सौंदर्य फुलविणारे व आकर्षक असे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले. येथे शहरासह उपनगरातील नागरिक आवर्जून भेट देतात. मात्र, तेथे घडणाऱ्या घटनांमुळे हे पर्यटनस्थळ बदनाम होऊ लागले आहे. तरुण-तरुणींकडून होणाऱ्या गैरप्रकारामुळे लहान मुलांसह नागरिक बर्ड व्हॅली उद्यानात जाणे टाळतात. ही बाब योग्य नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका व पोलिस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. 
- अनुराधा गोरखे, अध्यक्षा, महापालिका ‘अ’ प्रभाग

Web Title: bird vally garden issue