आभाळ पाहुण्यांची मांदियाळी...

आभाळ पाहुण्यांची मांदियाळी...

आतकरवाडीलगत बर्ड व्हॅलीतील दृश्‍य; पक्षिप्रेमींची गर्दी

पुणे - निसर्गाने मुक्‍तहस्ते केलेली इंद्रधनुषी रंगांची उधळण... मनमोहक सौंदर्य... चित्तवेधक, डौलदार चाल... नादमधुर चिवचिवाट... यांनी भारलेले प्रसन्न वातावरण सध्या आतकरवाडीशेजारी बर्ड व्हॅलीत अनुभवायला मिळत आहे. किल्ले सिंहगडच्या पायथ्यालगतच्या या बर्ड व्हॅलीत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हे रंगीबेरंगी बुलबुल आणि चिमणीवर्गीय डौलदार पक्षी स्वच्छंद विहरत असतात. या आभाळ पाहुण्यांच्या अदा आणि लोभस मुद्रा टिपण्यासाठी पक्षिप्रेमी सुटीच्या दिवशी गर्दी करीत आहेत. 

५० ते ६० विविध जातींचे पक्षी येथील पाणथळ परिसरात विहार करीत असतात. मानसरोवर, जम्मू-काश्‍मीर, हिमालय या परिसरातून काही परदेशी तसेच देशी पक्षी जिल्ह्याच्या विविध भागांत या हंगामात स्थलांतरित होत असतात. डिसेंबर ते फेब्रुवारी-मार्च अखरेपर्यंत येथे त्यांचा अधिवास असतो. पक्ष्यांचे सौंदर्य कॅमेराबद्ध करण्यासाठी पक्षिप्रेमी या भागाला भेट देत आहेत, असे ‘निसर्गयात्री’ या संस्थेचे पक्षिनिरीक्षक दत्तात्रेय लांघी यांनी सांगितले. 

उन्हाळ्याची चाहूल लागताच यातील काही पक्षी पुन्हा परतीच्या मार्गाला लागतात. बनेश्‍वर, ताम्हिणी घाट, मढी घाट आदी ठिकाणीही पाणवठ्याशेजारच्या वनराईत हे पक्षी मुक्काम करतात. यंदा वरुणराजा मनसोक्‍त बरसल्यामुळे पिकांवरील किडे, नाकतोडे, कीटकांची भरपूर मेजवानी त्यांना मिळते.

विदेशी पक्षी - गुलाबी चिमणी, राखी डोक्‍याची चिमणी
देशी पक्षी - नीलांग, नीलमणी, तांबूल, नीलशील कस्तूर, पिवळी लिटकुरी, निळी लिटकुरी, नीलपरी
स्थानिक पक्षी - शाही बुलबुल (स्वर्गीय नर्तक), कर्टुल, तांबट, पिवळ्या       गळ्याची चिमणी, काळ्या डोक्‍याची चिमणी, सातभाई 

बेसुमार वृक्षतोड, इमारतींमुळे कमी होणारी वनराई, वातावरणातील बदल यामुळे लवकर आटणारे जलस्रोत या घटकांमुळे पक्षांच्या अधिवासावर परिणाम होतो. बदलत्या निसर्गचक्रामुळे जैवविविधता आणि मानवी जीवन धोक्‍यात येऊ शकते. यासाठी शासन आणि पक्षितज्ज्ञांसह सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. जलस्रोतांच्या संवर्धनासाठी निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या घटकांना अटकाव करायला हवा. हवामानाचा अंदाज घेण्याची नैसर्गिक क्षमता या पक्षांमध्ये असते. त्याचे निरीक्षण करून त्यांचा अधिक अभ्यास करायला हवा.
- दत्तात्रेय लांघी, पक्षिनिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com