# BirdWatching फ्लेमिंगोंचे यंदा लवकर आगमन!

# BirdWatching फ्लेमिंगोंचे यंदा लवकर आगमन!

पुणे - परदेशी आणि देशी पक्ष्यांचे भिगवणजवळील उजनी जलाशय हे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ बनल्यामुळे सध्या मोठ्या संख्येने ते तेथे येत आहेत. तुलनेने यंदा रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांनी मोठ्या संख्येने लवकर महाराष्ट्र गाठले आहे. या पक्ष्यांना ‘क्‍लिक’ करून कॅमेरात बंदिस्त करण्यासाठी पक्षिप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांच्या वर्दळीने भिगवण गजबजले आहे.    

युरोप व मध्य आशियातून आपल्याकडे अनेक प्रकारचे ‘पाहुणे’ लाखो किलोमीटरचा प्रवास करून देशात दाखल होतात. हिवाळ्यात ते भिगवण मुक्कामावर पोचतात आणि मार्चपर्यंत परिसरात रमतात. थंडी कमी झाली आणि उन्हाळा वाढू लागला की, ते मायदेशीतील परतीचा प्रवास सुरू करतात. उत्तर आणि दक्षिण गोलार्धात वेगवेगळे हंगाम आणि तापमान असते. त्याचा फायदा घेऊन अनेक पक्ष्यांच्या प्रजाती आपल्या राहण्याच्या जागा काही महिन्यांसाठी बदलतात.

भीमा नदीवर बांधलेल्या उजनी धरणामुळे डिकसळ पारेवाडी आणि डाळज, कुंभारगाव या भिगवणजवळच्या पाणथळीच्या जागा पक्ष्यांच्या आवडीच्या झाल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी येथे आवर्जुन येतात. त्यामध्ये विविध पाणपक्ष्यांचा आणि माळावरच्या पक्ष्यांचा समावेश असतो. सुमारे १५५ प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. त्यामधे थापट्या, नकटा, लालसरी, थोरले व धाकटे मराल, तरंग, गडवाल, चक्रवाक ही बदके तसेच कादंब व पट्टकादंब हे हंस येतात. चमच्या, अवाक, तुतवार, शेकाट्या, उचाट्या, सोनचिखली, कुरव असे पाणथळीचे पक्षीही असून गप्पीदास, शंकर, रोहित, धोबी, क्रौंच या पक्ष्यांबरोबरच दलदल ससाणा, शिक्रा, तीसा, कैकर या  शिकारी पक्ष्यांचाही समावेश असतो. भिगवणच्या जलाशयावर सध्या देशी आणि परदेशी पक्षीनिरीक्षकांची गर्दी वाढू लागली आहे. भल्या पहाटेपासून त्यांचे निरीक्षण सुरू होते. 

या सगळ्यांमध्ये प्रमुख आकर्षण असते ते रोहित पक्ष्याचे अर्थातच फ्लेमिंगोचे. कुंभारगाव परिसरात रोहित पक्ष्यांचे आगमन झालेले असून, ते पाहण्यासाठी अनेक पक्षी निरीक्षक - पर्यटक गर्दी करीत आहेत. विशेषतः शनिवार-रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात भिगवण परिसरात आले आहेत. हातात पुरेसा वेळ घेऊन गेल्यास, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा गाठल्यास फ्लेमिंगोंबरोबरच पाणसाठ्यावर नांदणाऱ्या अनेक पक्ष्यांचे दर्शन हमखास होते. 
 
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फ्लेमिंगोंचे जास्त ‘साइटिंग’ आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस नसल्यामुळे त्यांचे स्थानिक स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले आहे. जवळपास सात-आठ हजारांत ही संख्या आहे. भिगवण, कुंभारगाव, धाराचिंचोली, डिकसळ या परिसरात प्रामुख्याने फ्लेमिंगो दिसत आहेत.
संदीप नगरे, पक्षी निरीक्षक 

पक्ष्यांच्या स्थलांतराचे प्रमुख हवाई मार्ग
निओ आर्क्‍टिक - उत्तर आणि दक्षिण अमेरिकेदरम्यान होणारे स्थलांतर.
युरेशियन - युरोप, आशिया आणि आफ्रिका या खंडांच्या दरम्यान होणारे स्थलांतर.
ऑस्ट्रेलियन - दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया या दरम्यान होणारे स्थलांतर.
पेलॅजिक - समुद्रावर होणारे स्थलांतर

पक्षी निरीक्षक भिगवणमध्ये ! 
रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांची संख्या दरवर्षी गुजरातमधील कच्छमध्ये जास्त असते; परंतु यंदा तेथे पाऊस जास्त झाला आहे. त्यामुळे पाणीसाठा भरपूर आहे. पाणी भरपूर असेल तर, रोहित पक्षी तेथे फारसे जात नाहीत. भिगवण परिसरात पाणीसाठा यंदा कमी आहे. परिणामी, रोहित पक्षी येथे मोठ्या संख्येने आले आहेत. त्यामुळे एरवी कच्छमध्ये जाणारे पक्षी निरीक्षक, पक्षिप्रेमींनी यंदा भिगवणकडे आपला मोर्चा वळवला आहे.

या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्र व गुजरातसह देशातील अनेक पाणथळाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा कमी पाणी व प्रतिकूल वातावरण आहे. त्या तुलनेत उजनी जलाशयामध्ये आवश्‍यक पाणी व अनुकूल वातावरण असल्यामुळे फ्लेमिंगोची संख्या वाढली आहे. सध्या उजनीवरील फ्लेमिंगो पाहण्यासाठी पक्षिमित्र मोठ्या संख्येने येत आहेत. पक्षिमित्रांनी पक्ष्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, पक्ष्यांना अडथळा निर्माण होईल, असे वर्तन करू नये. पक्ष्यांची शिकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास, ही बाब संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून द्यावी.
- डॉ. सतीश पांडे, पक्षी अभ्यासक, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com