जन्म-मृत्यू दाखल्यावरील अनावश्‍यक खर्चाला लगाम

रवींद्र जगधने
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पिंपरी - महापालिका पाच वर्षांपासून जन्म-मृत्यूच्या प्रत्येक दाखल्यासाठी ठेकेदाराला १५ रुपये १० पैसे देत होती. मात्र हे काम दुसऱ्या ठेकेदाराला ३ रुपये ९९ पैशांत दिले आहे. त्यामुळे महापालिकेची लाखो रुपयांची बचत होणार आहे. 

पिंपरी - महापालिका पाच वर्षांपासून जन्म-मृत्यूच्या प्रत्येक दाखल्यासाठी ठेकेदाराला १५ रुपये १० पैसे देत होती. मात्र हे काम दुसऱ्या ठेकेदाराला ३ रुपये ९९ पैशांत दिले आहे. त्यामुळे महापालिकेची लाखो रुपयांची बचत होणार आहे. 

शहराच्या हद्दीत खासगी किंवा महापालिका रुग्णालयात जन्म झाल्यास विविध सरकारी कामासाठी जन्म दाखल्याची किंवा मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दाखल्याची आवश्‍यकता असते. त्यासाठी महापालिकेने पाच वर्षांपूर्वी साई एंटरप्राइजेस हा ठेकेदार नेमला होता. या ठेकेदाराला एका दाखल्याच्या डाटा ऐंट्रीसाठी ३ रुपये १० पैसे, तर दाखला प्रिंटसह तयार करण्यासाठी १२ रुपये असे एकूण १५ रुपये १० पैसे दिले जात होते. त्यामुळे लाखोंचा अनावश्‍यक खर्च होत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निविदा काढून शुभम उद्योग या ठेकेदाराला १६ जुलैपासून ३ रुपये ९९ पैशांत एक जन्म किंवा मृत्यू दाखला असे काम दिले. 

या निर्णयामुळे दरवर्षी लाखो रुपये ठेकेदाराच्या घशात घालण्याच्या प्रवृत्तीस लगाम लागला असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. पाच वर्षांत किती जन्म-मृत्यू दाखले दिले. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना विचारले असता, ‘‘माहिती देणार नाही’’ असे उत्तर दिले. भाजप सरकार पारदर्शक प्रशासनाचा ढिंडोरा पिटत असताना महापालिका अधिकारी मात्र पारदर्शकतेला केराची टोपली दाखवत आहेत.

जन्म-मृत्यू दाखल्याचे सर्व काम डॉ. रॉय पाहत असल्यामुळे मी माहिती देऊ शकत नाही. 
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी

Web Title: birth-death certificate Unnecessary expenditure control