‘ती’चा जन्म ठरला गुन्हा!

पांडुरंग सरोदे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

ती ना गुन्हेगार, ना ‘त्यातली’. आई देहविक्रय करायची, हाच काय तो तिचा दोष. पण, पोलिसांनी ‘आई तशी मुलगी’चा नियम लावत तिच्यावर वेश्‍येचा शिक्का मारला अन्‌ तिला थेट सुधारगृहात धाडले.

पुणे- ती ना गुन्हेगार, ना ‘त्यातली’. आई देहविक्रय करायची, हाच काय तो तिचा दोष. पण, पोलिसांनी ‘आई तशी मुलगी’चा नियम लावत तिच्यावर वेश्‍येचा शिक्का मारला अन्‌ तिला थेट सुधारगृहात धाडले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली ही निरपराध तरुणी सध्या बंदिस्त कोठडीत नरकयातना भोगतेय.   

सुजाता (नाव बदलले आहे) बुधवार पेठेतील एका इमारतीमध्ये आजी व भावासमवेत राहते. देहविक्रय करणाऱ्या तिच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यापूर्वी आईने मुलीला व मुलाला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले. आता सुजाता वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे, तर तिचा भाऊ बांधकाम प्रकल्पावर काम करतोय. या कुटुंबाला परिसरातील नागरिक, मंडळांचे कार्यकर्ते व  पोलिसही ओळखतात. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेसात वाजता गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने जबरदस्तीने देहविक्रय करायला लावणाऱ्या कुंटणखाना मालकिणींच्या घरांवर छापे घालत १४ तरुणींना ताब्यात घेतले. तेव्हा आजीसमवेत घरात बसलेल्या सुजातालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने तिचे आधारकार्ड, महाविद्यालयाचे ओळखपत्र पोलिसांना दाखवून सोडण्याची विनवणी केली. स्थानिक नागरिकांनीही सुजाताचा देहविक्रयशी संबंध नसल्याचे सांगितले. तरीही पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून चुकीचा जबाब लिहून घेत न्यायालयात हजर केले. त्यानंतर इतर तरुणींप्रमाणे तिचीही सुधारगृहात रवानगी केली. सुधारगृहातील वागणुकीमुळे सुजाता त्रस्त झाली असून, रात्रंदिवस अश्रू ढाळत आहे.  

ती कर्करोगाने ग्रस्त   
सुजाताला आतड्याचा कर्करोग आहे. वर्षापूर्वी तिची शस्त्रक्रिया झाली असून, सध्या तिला औषधे सुरू आहेत. पोलिसांनी तिला पकडून नेले. त्यानंतर भावाने पोलिसांना तिच्या आजारपणाविषयी माहिती देऊन औषधे देण्याची विनंती केली; परंतु पोलिसांनी त्यालाच ‘पोलिसी खाक्‍या’ दाखवित औषधे देण्यास मज्जाव केला.

जन्म घेणे गुन्हा आहे काय?
देहविक्रय करणाऱ्या महिला मुलांना जन्म देतात. मुला-मुलींना या व्यवसायापासून दूर ठेवत त्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्या धडपडतात. देहविक्रय करणारीच्या पोटी जन्म घेणे हा गुन्हा आहे का, देहविक्रय करणारीची मुलगी आहे म्हणून पोलिस तिच्यावर कारवाई करीत तिचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणार का, असे संतप्त प्रश्‍न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले आहेत. हे प्रश्‍न संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडेही त्याची उत्तरे नाहीत.     

आमची कारवाई सुरू असताना संबंधित तरुणी घरामध्ये आढळली. आम्ही तिला विचारणा केली, तेव्हा तिने वेगवेगळी उत्तरे दिली. त्यामुळे तिला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. त्यानंतर सुधारगृहामध्ये पाठविले आहे.
- वैशाली चांदगुडे, पोलिस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birth was a crime in pune