भाजपनेच आरोपींना पावन केले - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

पिंपरी - ज्यांच्यावर तडीपार, मोका, दहशत, खंडणी, खून यासारखे गंभीर आरोप आहेत, अशा लोकांना भाजपने पावन करून घेतले. त्यामुळे तो गुंडाचाच पक्ष आहे, असा पुनर्रुच्चार करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला. 

पिंपरी - ज्यांच्यावर तडीपार, मोका, दहशत, खंडणी, खून यासारखे गंभीर आरोप आहेत, अशा लोकांना भाजपने पावन करून घेतले. त्यामुळे तो गुंडाचाच पक्ष आहे, असा पुनर्रुच्चार करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला. 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी ‘सकाळ’ शी बोलताना पवार यांनी भाजपने केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन करत त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पवार म्हणाले, ‘‘आज जे भाजपमध्ये गेले आहेत तेच आमच्या पक्षात पदाधिकारी होते आणि त्याचांवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आमच्याकडे असताना ते भ्रष्टाचारी होते आणि आता ते पवित्र कसे झाले, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. 

पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या कुणालाही पाठीशी घालणार नाही. ज्याच्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली त्यांना दूरच ठेवणार. 

दहा पैशाचे काम आणि एक रुपयांची प्रसिद्धी या पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेताना, पवार म्हणाले, गेल्या पावणेतीन वर्षांत केंद्रात आणि अडीच वर्षे राज्यात भाजपचेच सरकार आहे. त्यांनी आपल्या योजनांवर किती खर्च केला आणि प्रसिद्धी किती मिळवली, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा. यातून दहा पैशाचे काम आणि एक रुपयाची प्रसिद्धी नेमकी कोणी केली, याचे चित्र स्पष्ट होईल. 

शहरासाठी या दोन्ही सरकारांनी आतापर्यंत काहीच केलेले नाही. नुसत्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. अनधिकृत बांधकाम, रेडझोन, शास्तीकर, यापैकी एकही विषय मार्गी लागू शकला नाही. उलट अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात आम्ही नेमलेल्या समितीचा अहवाल त्यांनीच उच्च न्यायालयात सादर करून या प्रश्‍नाची कोंडी करून टाकली. बंद नळ योजना ही जनतेच्या हिताची आहे. पण, त्यात भाजपने राजकारण करत आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्‍न भिजत ठेवला. या उलट राज्यात आमचे सरकार असताना शहराला आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी देण्याची योजना मंजूर केली. जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली. रस्ते, उड्डाण पुलांची कामे केली. पुनर्वसनाच्या कामात भाजपच्या लोकांनी उच्च न्यायालयात जाऊन खोडा घालण्याचे काम केले. जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची आताच्या सरकारला इच्छाच नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

आतापर्यंत महापालिकेत आक्रमकपणे केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार आहोत. इतकेच नव्हे, तर येत्या पाच वर्षांत शहरासाठी काय करणार याचा जाहीरनामा सादर करणार आहोत. शहराचा सर्वांगीण विकास करून जागतिक स्तरावर पिंपरी-चिंचवडला कीर्ती मिळावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. 

समविचारी पक्षांबरोबरच आघाडी.....
महापालिका निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेससह समविचारी पक्षांबरोबरच आघाडी करणार आहोत, त्यासाठी विविध पक्षांबरोबर बोलणी सुरू आहेत. भाजप-शिवसेनेची युती झाली काय किंवा न झाली काय, त्याचा आम्हाला काहीच फरक पडणार नाही. मोठे मताधिक्‍य मिळवून आम्ही पुन्हा सत्तेत येणारच, असा विश्‍वास अजित पवार यांनी व्यक्‍त केला.

Web Title: bjp accused the holy