पावणेदोन कोटी मतांसाठी प्रयत्न करा - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

'राज्यात भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर सरकार आणायचे असेल, तर किमान 1 कोटी 67 लाख मते हवी आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 1 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त मते मिळविण्यासाठी प्रयत्न करून शतप्रतिशत भाजपचे स्वप्न साकार करा,'' असा मंत्र पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे कार्यकर्त्यांना दिला.

मार्केट यार्ड - 'राज्यात भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर सरकार आणायचे असेल, तर किमान 1 कोटी 67 लाख मते हवी आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 1 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त मते मिळविण्यासाठी प्रयत्न करून शतप्रतिशत भाजपचे स्वप्न साकार करा,'' असा मंत्र पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे कार्यकर्त्यांना दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. या प्रसंगी प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याबद्दल शहर भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'राज्यात 40 जागांवर पक्ष म्हणून आपण निश्‍चित जिंकणार, अशी स्थिती आहे. राज्यात काही झाले तरी शंभर जागा कायमच हमखास निवडून यायला पाहिजेत. त्यासाठी पक्षसंघटन मजबूत असले पाहिजे. मध्य प्रदेशातील कार्यकर्त्यांनी रक्त आटवले म्हणून तिकडे संघटन मजबूत आहे. आगामी निवडणुकीत 220 जागा येण्यासाठी सतत काम करीत राहा. नागरिकांच्या सगळ्या अडचणी सोडवा. मतदारांना विश्‍वासात घेणे सोपे नाही.''

'कॉंग्रेस हा पक्ष नसून संस्कृती आहे. कॉंग्रेस म्हणजे जातीयता, घराणेशाही, भ्रष्टाचार. म्हणूनच, भविष्यात "कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र' हे आपले धोरण आहे. आपली परंपरा शिवाजी महाराज, टिळक, हेडगेवार आणि सावरकरांची आहे. ही परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. तसेच, यापुढे हार-बुके आणू नका. हार, तुरे सगळे घरी देवाला ठेवा. जे हार तुरे आणतील, त्यांना यापुढे नमस्कार. यापुढे साधेपणाने वागून पुण्यातील सभा सगळ्यात मोठी घेऊ,'' असाही सल्ला पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पक्षसंघटन मजबूत हवे
राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये राज्याच्या तुलनेत पक्षसंघटन मजबूत आहे. मध्य प्रदेशात भाजपला कॉंग्रेसपेक्षा दीड लाख मते जास्त पडली. परंतु, सत्तेसाठी फक्त तीन जागा कमी पडल्या. त्यामुळे पक्षसंघटन भक्कम कसे होईल, याकडे आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. सोलापुरात नेतेमंडळी कोठेही असली, तरी मतदार मात्र भाजपबरोबरच आहेत. असे वातावरण आपल्याला राज्यात सर्वत्र करायचे आहे, असेही पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Activists Campaign Chandrakant Patil Politics