Kasba bypoll Election : पोटनिवडणुकीच्या परीक्षेसाठी राजकीय यंत्रणा सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP appointed 30 workers for one booth Kasba bypoll Election politics congress

Kasba bypoll Election : पोटनिवडणुकीच्या परीक्षेसाठी राजकीय यंत्रणा सज्ज

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जोरदार प्रचार केल्यानंतर आता हक्काचे मतदार घराबाहेर काढून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे आव्हान राजकीय पक्षांपुढे आहे. भाजपने एका बुथसाठी ३० कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे.

तर काँग्रेसने प्रत्येक बुथला वरिष्ठ पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पोटनिवडणुकीच्या परीक्षेसाठी दोन्ही पक्ष सज्ज झाले आहे.

कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रमुख लढत भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस महायुतीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी या दोन्ही पक्षाकडून तयारी सुरू आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात ७६ ठिकाणी २७६ बूथ आहेत. २ लाख ७५ हजार ६७९ मतदार आहेत.

भाजपने प्रत्येक बुथला म्हणजे एक हजार मतदारांच्या मागे ३० कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. या कार्यकर्त्यांनी त्यांना ज्या मतदारांची जबाबदारी दिली आहे, त्यांना भेटून मतदानासाठी आणण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक केंद्रांच्या बाहेर एक पक्षाचा बूथ असणार आहे. तेथे लॅपटॉप, प्रिंटर देण्यात आला असून, ज्या मतदारांकडे स्लीप नसले, त्यांना ही सेवा पुरविली जाणार आहे. पोलिंग एजंट व त्याला रिलिव्हर यांची नियुक्ती झाली आहे.

दोन मतदार याद्या, पेन, पेन्सील, खोडरबर यासह इतर साहित्य देण्यात आले आहे. मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यापासून ते मतदान केंद्रातील पोलिंग एजंट पर्यंत सुमारे ७ हजार कार्यकर्ते या कामात आहेत.

काँग्रेसनेही ८० मतदान केंद्राची जबाबदारी एका वरिष्ठ नेत्यांकडे दिली आहे. त्यांच्याकडून संबंधित केंद्राची व सर्व कार्यकर्त्यांची व्यवस्था पाहणे, मतदान करून देणे, अडचणी आल्यावर सोडविणे याकडे लक्ष दिले जाणार आहे.

मतदान केंद्रावर गेलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने त्या ठिकाणचा फोटो पाठवून तो बूथवरअसल्याचे रिपोर्टींग करावे लागणार आहे. तसेच दर तीन तासांनी बूथवर किती मतदान झाले, किती राहिले याचा अहवाल पाठवावा लागणार आहे. या सर्वावर काँग्रेस भवन मधून नियंत्रण ठेवले जाणार असून, काही गडबड झाली तर थेट काँग्रेस भवन येथे त्याची माहिती देण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी असणार आहेत.

‘‘भाजपने मतदानासाठीची सर्व यंत्रणा तयार केली आहे. यामध्ये सुमारे ७ हजार कार्यकर्ते सहभागी आहेत. कसब्यात मतदान आहे, पण शहराच्या इतर भागात राहणाऱ्या ५ हजार मतदारांशी संपर्क शाधला असून, त्यांनी मतदानाला येण्याचे मान्य केले आहे ’’

- राजेश पांडे, संघटन सरचिटणीस, भाजप

‘‘काँग्रेसने प्रत्येक मतदान केंद्राची एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यास जबाबदारी दिली आहे. त्यांच्यामाध्यमातून त्या भागातील यंत्रणा काम करेल. पोलिंग एजंटचे ट्रेनिंग घेतले आहे, त्यांच्यासाठी रिलिव्हरची नियुक्त केले आहेत. जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’

- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :BjpCongresselection