‘स्वीकृत’ची नावे बदलणार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

पिंपरी - स्वीकृत सदस्य निवडीवरून शहर भाजपमध्ये निर्माण झालेला पेच दूर करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप मुंबईत चर्चा करणार असल्‍याचे  विश्‍वसनीय वृत्त आहे. पक्षातील काही कार्यकर्त्यांनी गेल्या शनिवारी असंतोष प्रकट केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक होत असून, त्यात नव्याने नावे निवडली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल ७७ जागा मिळवून भाजप सत्तेत आला आहे. त्यांना एकूण सदस्यांच्या प्रमाणात तीन स्वीकृत सदस्य निवडता येणार आहेत. त्यासाठी गेल्या ९ मे रोजी पक्षाने ॲड. मोरेश्‍वर शेडगे, बाबू नायर आणि माउली थोरात यांची नावे आयुक्तांना दिली. ही नावे थेट मुख्यमंत्र्यांनी सुचविली होती. बाबू नायर यांचे नाव राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी, तर माउली थोरात यांचे नाव खासदार अमर साबळे यांनी सुचविल्याचे सांगण्यात येते. परंतु, कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना झाल्याने त्‍यांनी साबळे व पटवर्धन यांचे पुतळे जाळले. छायाचित्रांना काळे फासले. या प्रकारामुळे शहर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. संतप्त कार्यकर्त्यांनी निदर्शने करत साबळे व पटवर्धन यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. पक्षाच्या कोअर कमिटीने नावे निवडून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे अधिकार जगताप यांना दिले असताना साबळे व पटवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांना परस्पर ही नावे कळविल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

आशा पुन्हा पल्लवित...
आता हे प्रकरण थेट मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांपर्यंत गेल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. नियोजित स्वीकृत सदस्यांच्या नावात बदल करावयाचा किंवा नाही याचे सर्वस्वी अधिकार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहेत. त्यामुळे यात पुन्हा काही बदल होतो की हीच नावे कायम राहतात ते या बैठकीनंतर स्पष्ट होईल. या चर्चेच्या निमित्ताने अन्य इच्छुकांचे डोळेही या बैठकीकडे लागले असून, त्यांच्याही आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. सध्या आयुक्तांकडे ज्यांची नावे दिलेली आहेत, त्यांच्या कागदपत्रांबाबत काही त्रुटी असल्याचे पक्षवर्तुळात बोलले जात आहे.

Web Title: Bjp approved member selection