शैक्षणिक विकासाकडे भाजपचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे असलेल्या डेक्कन जिमखाना- मॉडेल कॉलनी (प्रभाग १४) मधील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार विद्यार्थी केंद्रित बनला आहे. ई-लायब्ररीपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रापर्यंतच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात येत आहे.

पुणे - शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे असलेल्या डेक्कन जिमखाना- मॉडेल कॉलनी (प्रभाग १४) मधील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार विद्यार्थी केंद्रित बनला आहे. ई-लायब्ररीपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रापर्यंतच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात येत आहे.

डेक्कन जिमखाना- मॉडेल कॉलनी प्रभागातील भाजपच्या उमेदवार प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्यासह सिद्धार्थ शिरोळे, नीलिमा खाडे आणि स्वाती लोखंडे या उमेदवारांनी फर्ग्युसन कॉलेज रस्ता, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, गणेशखिंड रस्ता भागांतील मतदारांच्या भेटी घेतल्या. या वेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभागात नागरी सुविधा पुरविण्यासोबतच शिक्षण क्षेत्रावर या उमेदवारांनी अधिक लक्ष्य केंद्रित केले आहे. मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, बीएमसीसी कॉलेज, एमएमसीसी कॉलेज, गरवारे कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन या शैक्षणिक संस्थांसोबतच गोखले इन्स्टिट्यूट, आगरकर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था अशा देशपातळीवरील अनेक संशोधन संस्था या प्रभागात आहेत. त्यामुळे शिवाजीनगर गावठाण, कामगार पुतळा, तोफखाना, पोलिस लाइन, वडारवाडी, पांडवनगर, हनुमाननगर, गोखलेनगर, डेक्कन भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. या विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरविण्यावर विशेष भर देणार असल्याचे आश्वासन प्रा. एकबोटे यांनी दिले.

प्रा. एकबोटे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान पाहता त्यांचे सर्वाधिक लक्ष शिक्षणावर आहे. त्यामुळे प्रचारात त्यांनी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ई- लायब्ररी, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केंद्र, स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थ्यांना जेवण्यासाठी उत्तम सुविधा आणि अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्याचे आश्वासन त्यांनी प्रचारादरम्यान दिले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले.

Web Title: BJP attention to educational development