पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने ‘फुलविला’ विकास

Ramp-Road
Ramp-Road

पिंपरी - पंतप्रधान आवास योजना मार्गी लावणे, हिंजवडी मार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी डांगे चौकात ग्रेड सेपरेटर उभारणे, समाविष्ट गावांत रस्त्यांचे जाळे, अनधिकृत बांधकामांच्या शास्तीकर माफीसाठी काही प्रमाणात यश, त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा, संतपीठ उभारणीला प्राधान्य, अर्बन स्ट्रीट योजनेनुसार कामे, अशी काही ठोस कामे भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन वर्षांत करून आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तत्कालीन बारामती लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवडचा समावेश होता. २००२ पासून सुमारे १५ वर्षे महापालिकेत पक्षाची एकहाती सत्ता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दांनुसार शहर विकासाबाबत निर्णय घेतले जात होते. या कालावधीत पुणे-मुंबई महामार्गाचे दापोडीपासून निगडीपर्यंत, औंध-रावेत बीआरटी मार्ग, प्राधिकरणातील स्पाइन रस्ता, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता, नाशिक फाटा-वाकड रस्ता यांच्यासह विविध उड्डाण पुलांचे प्रश्‍न मार्गी लागले. पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडमधील रस्ते प्रशस्त असल्याचे लोक म्हणू लागले. तरीही काही तरी बिनसले आणि लोकांचा कल बदलला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले.

राष्ट्रवादीला अवघ्या ३६ जागांवर समाधान मानावे लागले. भारतीय जनता पक्षाने १२८ पैकी तब्बल ७७ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. अर्थात यामागे, राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेले पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा वाटा मोठा आहे. पक्षाच्या जुन्या फळीतील एकनाथ पवार, नामदेव ढाके, विलास मडिगेरी आदींनीही सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे जगताप गट, लांडगे गट व जुने कार्यकर्ते अशी पक्षाची विभागणी झाल्याचे बोलले जाऊ लागले. अशा स्थितीत शहराचा विकास कसा होईल?

राष्ट्रवादीच्या काळात मंजूर कामे मार्गी लागतील का, शहराला नवीन काही मिळेल का, असे प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ लागले होते. परंतु, त्याला पूर्ण क्षमतेने भाजपने उत्तर दिल्याचे गेल्या तीन वर्षांच्या वाटचालीतून व त्यांच्या कार्यकाळातील अर्थसंकल्पातून दिसून येते.

महत्त्वाची कामे

  • पंतप्रधान आवास योजनेतून चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी, रावेत येथील गृहप्रकल्प मार्गी
  • भोसरीत कबड्डी सेंटर, बोऱ्हाडेवाडीत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणे
  • चऱ्होली, डुडुळगाव, रावेत, पुनावळे, ताथवडेत रस्त्यांचे जाळे
  • आंद्रा, भामा-आसखेड योजनेला चालना, वाघोली योजनेचे पाण्यासाठी प्रयत्न
  • मोशीत इंटरनॅशनल स्केटिंग रिंक निर्मितीसाठी जागा उपलब्ध करून काम सुरू
  • स्पाइन रस्त्यावर शरदनगर, दापोडीत सीएमईसमोर व पिंपळे सौदागरला भुयारी मार्ग उभारणी
  • चिखलीत प्रस्तावित संत पीठ आणि कुदळवाडीत प्रेक्षागृह उभारणीस प्रारंभ
  • एम्पायर इस्टेट सोसायटीजवळील उड्डाण पुलाला दोन्ही बाजूस रॅम्पची निर्मिती
  • बोपखेलकरांच्या सोयीसाठी मुळा नदीवर पूल उभारण्याचे काम मार्गी
  • वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळून काम सुरू
  • (राष्ट्रवादीच्या काळातील प्रस्तावित काही कामे भाजपच्या काळात पूर्ण झाली)

पालिका अर्थसंकल्प सोमवारी ‘स्थायी’समोर
महापालिकेचा आगामी वर्ष २०२०-२१ चा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर सोमवारी (ता. १७) सकाळी अकरा वाजता स्थायी समितीसमोर सादर करतील, अशी माहिती स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी सांगितले. गेल्या वर्षीचा मूळ अर्थसंकल्प चार हजार ६२० कोटींचा, तर केंद्र सरकारच्या योजनांसह सहा हजार १८३ कोटींचा रुपयांचा होता. त्यानुसार कामे सुरू आहेत. केंद्र सरकारच्या योजनांनुसार स्मार्ट सिटी, पाणीपुरवठ्यासाठी अमृत व २४ बाय सात योजनेची कामे सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com