Vidhan Sabha 2019 : भाजपच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजप पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सोमवारी फोडण्यात येणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी नड्डा संवाद साधणार आहेत, असे शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा 2019
पुणे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजप पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सोमवारी फोडण्यात येणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी नड्डा संवाद साधणार आहेत, असे शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खासदार गिरीश बापट, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, उज्ज्वल केसकर, दीपक मिसाळ या वेळी उपस्थित होते. मिसाळ म्हणाल्या, ‘‘नड्डा यांचे सकाळी ११ वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतील. त्यानंतर हॉटेल रामी ग्रॅंड येथे पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. चातुर्मासानिमित्त जैन धर्मगुरू शिवमुनी हे पुण्यात आहेत. नड्डा हे गंगाधाम रस्त्यावरील वर्धमान पूरम येथे त्यांची भेट घेणार आहेत.

भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी सायंकाळी साडेचार वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे शहर, जिल्हा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. निवडणूक कशी लढवायची, यावर नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी राष्ट्रीय सरचिटणीस व्ही. सतीश, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत पुण्यातील उद्योजक, डॉक्‍टर, वकील, व्यापारी यांसह इतर क्षेत्रांतील मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी रात्री साडेसात वाजता पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरटॉन येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये कलम ३७० सह इतर मुद्द्यांवर नड्डा संवाद साधणार आहेत, असे मिसाळ  यांनी सांगितले.

जगताप म्हणाले, ‘‘मेळाव्यासाठी पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.’’ बापट म्हणाले, ‘‘२०१४ पासून भाजपचा आलेख चढता आहे. आगामी निवडणुकीत युतीच्या माध्यमातून भाजपचा मुख्यमंत्री होणार.’’

आठ जागांवरील  दावा कायम 
विधानसभेत भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्‍यता आहे. पुण्यात काय होणार, असे विचारले असता मिसाळ म्हणाल्या, ‘‘मी भाजपची शहराध्यक्षा असल्याने आठही जागा भाजपला मिळाव्यात, असा माझा आग्रह आहे. त्याच्या पुढील निर्णय पक्षाचे नेते घेतील.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP campaign will begin today