शहराध्यक्षांच्या स्वागताला पदाधिकाऱ्यांचीच दांडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

विधानसभेसाठी फक्त भाजपचा नारा  
विधानसभेमध्ये भाजप- शिवसेना युती होणार, असे सांगितले जात असले तरी, नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विधानसभेसाठी सर्वतोपरी भाजप आणि भाजपचा नारा देऊयात, ही निवडणूक जिंकूयात, असे स्पष्टपणे सांगितले.

पुणे - भाजपने प्रथमच पुण्यात शहराध्यक्षपदी महिलेची निवड केलेली असताना त्यांच्या स्वागताला मात्र महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह आमदारांनी दांडी मारली. एकही पदाधिकारी या वेळी पक्ष कार्यालयाकडे फिरकला नाही. 

भाजपचे मावळते शहराध्यक्ष व नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले यांनी शहराध्यक्ष पदाची सूत्रे माधुरी मिसाळ यांच्याकडे जंगली महाराज रस्ता येथील भाजपच्या कार्यालयात मंगळवारी सुपूर्त केली. या वेळी सरचिटणीस गणेश बीडकर, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, विभागीय संघटक रवी अनासकर आदी उपस्थित होते. पक्ष कार्यालयाबाहेर ढोल-ताशांच्या गजरात, फटाके फोडून, घोषणा देत मिसाळ यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी पक्ष कार्यालयाबाहेरील गर्दीत बहुतांश कार्यकर्ते आणि नगरसेवक पर्वती विधानसभा मतदारसंघातीलच होते. इतर भागातील कार्यकर्त्यांची उपस्थिती कमी होती. महालिकेतील पदाधिकारी, आमदार या वेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेले नव्हते.

यावर मिसाळ यांनी ‘जे आले नाहीत त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे,’ असा खुलासा केला असला तरी, पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल चर्चा येथे रंगली होती. 

पत्रकारांशी बोलताना मिसाळ म्हणाल्या, ‘‘युतीचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेतील. पक्ष संघटनेचे पद आल्यानंतर निवडणूक लढवू नये असे नाही. यापूर्वी रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणूक लढवली होती, त्यामुळे मीही निवडणूक लढवणार आहे.’’ या वेळी गणेश बीडकर यांनीही कसब्यातून निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखविली.

घरामध्येही सर्व जण वहिनीशी मनमोकळे बोलत असतात. पक्षातील अनेक जण मला वहिनी म्हणतात. त्यामुळे पक्षाचे काम करताना काही गोष्टी आजूबाजूला न बोलता थेट माझ्याशी बोला, यातून निम्मे वाद संपतील.
- माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष, भाजप  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP City President madhuri Misal Welcome Office bearer Absent Politics