भाजप नगरसेवकांचा ‘हात’ आखडताच

BJP
BJP

पुणे - सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत सर्वांनी आर्थिक मदत देण्याचा फतवा ‘प्रदेश’च्या आदेशावरून शहर भाजपने काढला खरा. परंतु, अनेक नगरसेवकांनी हात आखडता घेतल्यामुळे हा निधी जमा होऊ शकला नाही. त्यामुळे वैतागलेल्या नेत्यांनी पक्षशिस्तीचे कारण पुढे करून झाडाझडती केल्याने पक्षात हा चर्चेचा विषय झाला आहे.

सांगली आणि कोल्हापूर भागात संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि पूरगस्त साह्य समितीचे रघुनाथ कुलकर्णी यांनी शहर भाजपला मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर भाजपनेदेखील किमान एक कोटीचे टार्गेट निश्‍चित केले. ते पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किमान शंभर रुपये, पदाधिकाऱ्यांना शंभर रुपयांपेक्षा अधिक, सरचिटणीस यांना पन्नास हजार रुपये, तर नगरसेवकांना एक महिन्याचे मानधन आणि किमान एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे फर्मान पक्षाकडून सोडण्यात आले.

पक्षादेशाचे पालन काहींनी केले. मात्र, जवळपास तीस ते चाळीस नगरसेवकांनी हात आखडता घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या बैठकीत गैरहजेरी आणि पक्षशिस्तीचे कारण पुढे करून झाडाझडती घेतली. ‘नोटिसा काढा,’ ‘कारवाई करा’ अशा सूचनादेखील शहराध्यक्षांना देण्यात आल्या. पैसे जमा करण्यासाठी मंगळवारी (ता. १०) ही अंतिम मुदतही पक्षाकडून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापही काही नगरसेवकांनी मदतीसाठीचा हात आखडताच ठेवला असल्याचे समोर आले आहे. जमा होणाऱ्या या निधीतून पक्षाच्या नावाने दोन्ही जिल्ह्यांत वास्तू उभी करण्याचा मनोदय आहे. परंतु, शिस्तबद्ध म्हणून ओळख असलेल्या पक्षातल्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com