भाजपच्या नगरसेवकांचे बौद्धिक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

पुणे - महापालिकेच्या सभागृहात अनुभवी विरोधकांच्या चालीपुढे सत्ताधारी भाजपची डाळ ‘शिजत’ नसल्याने पक्ष ‘बॅकफूट’वर जात असल्याचे नेतृत्वाच्या निदर्शनास आले आहे. अनुभवाविना भाजपला अडचणी येत असल्याने या पक्षाच्या नगरसेवकांना राजकीय ‘शहाणपणा’ शिकविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

नगरसेवकांना ‘बौद्धिक’ शिस्त लावण्याच्या निमित्ताने संघ महापालिकेच्या कामकाजातही भाजपसोबत राहणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप नगरसेवकांना संघाचे धडे गिरविण्याचे आदेश श्रेष्ठींनी दिल्याचे समजते. 

महापालिकेत सत्ता स्थापन करून भाजपला एक वर्ष पूर्ण झाले. सभागृहात या पक्षाचे बहुतांश नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. दुसरीकडे मात्र, विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसकडे ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक आहेत. तेव्हा, सत्ताधारी- विरोधकांमध्ये अनेकदा वादाच्या घटना घडतात. त्यात, विरोधक बाजी मारत असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे संख्याबळ शंभरहून अधिक असले, तरी त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच नगरसेवक आपली बाजू मांडतात. या पार्श्‍वभूमीवर भाजपने आता सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. 

महापालिकेतील महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि विधी समितीच्या सदस्यांना प्रशिक्षण दिले असून, राजकीय डावपेचांसोबतच सभागृहात बोलण्याची शैली, त्याची परिणामकारकता याचेही धडे या मंडळींना दिले. एवढेच नव्हे तर प्रभागात, सभागृहात लोकांना सामोरे जाताना ‘पेहराव’ कसा असावा, हेही आवर्जून सांगण्यात आले. 

दरम्यान, महापालिकेच्या सभागृहात सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यातील वादाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने या प्रशिक्षणाला अधिक महत्त्व दिल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपच्या नगरसेवकांना कामकाजाची संपूर्ण माहिती आणि त्यासाठीची शिस्त कळावी, यासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पक्षाच्या सर्व नगरसेवकांना ते देण्यात येईल. त्यासाठी तीन गट केले आहेत.
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप

Web Title: BJP Corporator Intellectual politics