व्यक्ती नव्हे; पक्षच उमेदवारी ठरविणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

पुणे : "उमेदवारी कोणीही गृहित धरू नका, पक्ष उमेदवारी निश्‍चित करणार आहे,' "उमेदवारी मिळाली असे समजून वैयक्तिक प्रचार करण्यापेक्षा पक्षाचा प्रचार करा,' "उमेदवारी ही कोणतीही व्यक्ती नव्हे; तर पक्ष ठरविणार आहे', अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पाच प्रभागांतील इच्छूक उमेदवारांना मंगळवारी तंबी दिली.

पुणे : "उमेदवारी कोणीही गृहित धरू नका, पक्ष उमेदवारी निश्‍चित करणार आहे,' "उमेदवारी मिळाली असे समजून वैयक्तिक प्रचार करण्यापेक्षा पक्षाचा प्रचार करा,' "उमेदवारी ही कोणतीही व्यक्ती नव्हे; तर पक्ष ठरविणार आहे', अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पाच प्रभागांतील इच्छूक उमेदवारांना मंगळवारी तंबी दिली.

महापालिका निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 9, 10, 11, 12, 13 आणि 31 येथील इच्छूक उमेदवारांची बैठक पक्षाच्या हंगामी निवडणूक कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी अडीचदरम्यान झाली. पाचही प्रभागांतून सुुमारे 120-130 इच्छूक उपस्थित होते. त्यातील काहीजणांनी फ्लेक्‍सद्वारे; तसेच दीपावलीनिमित्त सरंजाम वाटप करीत प्रचाराला सुरवात केल्याबद्दल गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत ते म्हणाले, ""पक्षाची उमेदवारी कोणतीही एक व्यक्ती ठरविणार नाही. त्यासाठी उमेदवारी समिती आहे; तसेच शहर, राज्य आणि केंद्र स्तरावर पक्षाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यात जो उमेदवार निवडणूक जिंकेल, असा अंदाज व्यक्त होईल, त्यालाच उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच उमेदवारी मिळाली म्हणून प्रचाराला कोणी सुरवात करीत असेल तर, तो त्याचा भ्रम असेल.''

शहरात कोणीही स्वकर्तृत्वावर नव्हे तर पक्षाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षसंघटना हीच प्रधान व्यवस्था असेल. शहराने शिफारस केलेल्या नावांना प्रदेशाकडून मंजुरी मिळाल्यावरच उमेदवार निश्‍चित होणार, हे लक्षात ठेवा, अशा गोगावले यांनी इच्छुकांना बजावले. आताच प्रचार करायचा असेल तर, पक्षाचा प्रचार करा. पुणे महापालिकेत सत्ता पक्षाची आणायची आहे. त्यासाठी झटणाऱ्यांनाच संधी मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणीही परस्पर मुलाखती घेऊ नका किंवा तुम्हीही पक्षाशिवाय कोणाला मुलाखती देऊ नका. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी मिळेलच, असा समज कोणी करून घेऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर गोगावले यांनी प्रत्येक प्रभागातील इच्छूकांची स्वतंत्र बैठक घेतली. त्यातही पक्षाच्याच भूमिकेचा प्रचार करण्यास बजाविण्यात आले.

Web Title: BJP to decide on candidates for Pune Municipal Corporations