Loksabha 2019 : पोलिसांकडून परवानगीला उशीर; भाजपची एकही कोपरा सभा नाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

भाजपने शहरात 200 कोपरा सभा घेण्याची घोषणा केली होती. मात्र, ज्या चौकात त्या घेण्यात येणार होत्या, तेथे दोनपेक्षा जास्त पोलिस ठाण्यांच्या हद्द असल्याने परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने अद्याप एकही कोपरा सभा झालेली नाही. 

पुणे : भाजपने शहरात 200 कोपरा सभा घेण्याची घोषणा केली होती. मात्र, ज्या चौकात त्या घेण्यात येणार होत्या, तेथे दोनपेक्षा जास्त पोलिस ठाण्यांच्या हद्द असल्याने परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने अद्याप एकही कोपरा सभा झालेली नाही. 

महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी सहा विधानसभा मतदारसंघात दोनशे कोपरा सभा घेतल्या जाणार असल्याचे जाहीर केले होते. 
त्या घेताना महापालिकेची, पोलिसांची परवानगी आवश्‍यक आहे. निवडणूक प्रचार फेरी, कोपरा सभा, मोठ्या सभांना लवकर परवानगी मिळावी, यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. या ठिकाणी अर्जही करण्यात आले; पण कोपरा सभा कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत होणार, हे स्पष्ट होत नसल्याने परवानग्यांना उशीर झाला आहे.

भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, "शहरात कोपरा सभा होणार होत्या. त्यासाठी एलईडी रथसुद्धा तयार करण्यात आला आहे; पण एक चौक तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येत असल्याने परवानग्या घेण्यासाठी फिरावे लागत असल्याने आत्तापर्यंत एकही कोपरा सभा झालेली नाही. या परवानग्या लवकर पूर्ण करून उद्यापासून कोपरा सभा घेण्याचा प्रयत्न आहे.'' 

मुख्यमंत्र्यांच्या तिसऱ्या सभेसाठी प्रयत्न 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे बुधवारी (ता. 17) सभा होणार आहे. त्यांचा मुक्काम पुण्यात होण्याची शक्‍यता आहे. या वेळी प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्रीही पुण्यात असतील. त्यामुळे त्यांच्यावेळेचा उपयोग करून घेऊन, कोथरूडमध्ये सभा घेण्याचा प्रयत्न आहे. तसेच पुढील आठवड्यात पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, पंकजा मुंडे यांच्या सभा होणार आहेत, असे गोगावले यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन सभा घेणार आहेत. त्यानुसार पुण्यात दोन सभा झाल्यानंतर आता तिसरी सभा होणार का? याकडे लक्ष लागले आहे. 

जाहीरनामा 17 एप्रिलला 
भाजपने पुणेकरांसाठी जाहीरनामा तयार केला आहे. तो तयार करताना "भारत की मन की बात' म्हणून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. या 15 हजार सूचनांचा विचार केला आहे. हा जाहीरनामा 17 एप्रिल रोजी प्रकाशित केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील किती कामे दोन वर्षांत पूर्ण झाली, हे या वेळी सांगितले जाईल. 

Web Title: BJP does not have any corner meeting because of police permission