
BJP Pune: भाजपचे भावी खासदार ठरले? बापट यांना जाऊन तीन दिवस झाले नाहीत, तोच बॅनरबाजी; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं तीन दिवसांपूर्वी पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. गिरीश बापट पुण्याचे खासदार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
दरम्यान, गिरीश बापट यांना जाऊन अवघे तीन दिवस उलटले नाही तोच या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या एका नेत्याची तर पुण्यात बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यावर या नेत्याचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना जाऊन तीनच दिवस झाले असताना, पुण्यातील मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरली आहे. मुळीक यांचे बॅनर लागल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी यासंबधी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटमध्ये "१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत .. तोवरच तुम्ही बैट पॅड घालून तयार" अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.
गिरीश बापट यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता येत्या सहा महिन्यांत या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात जगदिश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून जगदीश मुळीक यांचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे ही बॅनरबाजी राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
जगदीश मुळीक कोण आहेत?
जगदीश मुळीक हे भाजपचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. ते माजी आमदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुळीक यांच्या नावाने मोठेमोठे बॅनर्स लावले आहेत. त्यावर भावी खासदार जगदीश मुळीक असे लिहिले आहे. 1 एप्रिल रोजी मुळीक यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स पुणे शहरात लावले आहेत.