यशस्वी रणनीतीमुळे बापट दिल्लीत

ब्रिजमोहन पाटील
शनिवार, 25 मे 2019

मोदी फॅक्‍टर, शहराच्या राजकारणात गेली चाळीस वर्षे काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क आणि त्याला पक्ष संघटनेची मिळालेली साथ यामुळे शहर भाजपचे हेडमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांना अखेर दिल्ली गाठणे शक्‍य झाले. देशभरात ‘फिर एक बार मोदी सरकार’ या हाकेला पुणेकरांनीही प्रतिसाद दिल्याने सलग दुसऱ्यांदा लोकसभेला विजय मिळून पुण्यात भाजपला नवा इतिहास घडविता आला.

मोदी फॅक्‍टर, शहराच्या राजकारणात गेली चाळीस वर्षे काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क आणि त्याला पक्ष संघटनेची मिळालेली साथ यामुळे शहर भाजपचे हेडमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांना अखेर दिल्ली गाठणे शक्‍य झाले. देशभरात ‘फिर एक बार मोदी सरकार’ या हाकेला पुणेकरांनीही प्रतिसाद दिल्याने सलग दुसऱ्यांदा लोकसभेला विजय मिळून पुण्यात भाजपला नवा इतिहास घडविता आला.

निवडणूक जिंकणे हा निकष लावून भाजप नेत्यांनी अनिल शिरोळे यांनी चांगले काम करूनही त्यांच्याऐवजी पक्षश्रेष्ठींनी बापट यांना लोकसभेची उमेदवारी दिली. काँग्रेसने अनेक दिवस चिंतन करून बापट यांच्या विरोधात माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली. जोशी यांचे नाव जाहीर होताच ‘काँग्रेसने भाजपला निवडणूक बाय दिली’ अशी चर्चा काँग्रेससह पुणेकरांमध्ये सुरू झाली. बापट यांनीही माझ्यापुढे काँग्रेसने ‘रेवडी पहिलवान’ दिला, अशी बोचरी टीका केली. काँग्रेसने बापट यांच्यावर चणाडाळ घोटाळा, त्यांचे वादग्रस्त वक्तव्य निवडणुकीच्या प्रचारात आणून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपने त्याकडे लक्ष न देता आपल्या रणनीतीनुसार प्रचार केला.

नरेंद्र मोदी यांचे शक्तिशाली नेतृत्व, केंद्र सरकारची कामे आणि योजनांचा प्रचार करण्यावर भर दिला. पक्षाचे बूथ प्रमुख, शक्तिकेंद्रांची यंत्रणा असली तरी काही नाराज गटाने या यंत्रणेला काम करू न देण्याचा प्रयत्न केला. या यंत्रणेवर बापट यांनी नियंत्रण मिळवून उमेदवार परिचय पत्रक, स्लिपावाटप घरोघरी पोचविण्याचे काम केलेच. शिवाय शहराच्या राजकारणात चाळीस वर्षे मुरलेल्या बापट यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र आहेत. अनेक संस्था, संघटना, मंडळांशी असलेला वैयक्तिक संबंध. त्यांनी बापट यांना अदृश्‍यपणे मदत करून विजयास हातभार लावला. हे बापट यांच्या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पीयूष गोयल यांसह अन्य नेत्यांचे कार्यक्रम घेऊन वातावरण ढवळून काढले. शिवाय बापट यांनी शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, रासप यांसह इतर घटक पक्षांना सन्मानाने प्रचारात आणले. 

काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीप्रमाणे पुण्यातही गोंधळ सुरू होता, त्याचा फायदा उठवल्याने बापट यांचा विजय अधिकच सोपा झाला. बापट यांनी शिरोळे यांचा तीन लाख १५ हजार मताधिक्‍याचा विक्रम मोडून तीन लाख २४ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.

भाजप पदाधिकारी म्हणतात
सरकारने किती कामे केली त्यावर ही निवडणूक अवलंबून होती. त्यात पुण्यातील चोखंदळ मतदारांनी नरेंद्र मोदी यांचा प्रतिनिधी म्हणून गिरीश बापट यांना निवडले. त्याबद्दल मी आभारी आहे.  
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप 

हा विजय कर्तृत्व आणि नेतृत्वाचा आहे. पक्षाचे संघटन व गिरीश बापट यांच्या जनसंपर्कामुळे भाजपचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला आहे. 
- विजय काळे, आमदार, निवडणूक प्रचारप्रमुख.  

गिरीश बापट हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी पुणेकरांच्या मनात भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यांच्यामुळे प्रभावी खासदार मिळाला आहेत. 
- मुक्ता टिळक, महापौर, 

नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्‍वासामुळे हा ऐतिहासिक विजय साकारला आहे. गिरीश बापट यांचा प्रचंड मताने विजय झाल्याने त्यांचे अभिनंदन. 
- अनिल शिरोळे, माजी खासदार. 

कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि मोदी लाट यामुळे गिरीश बापट विजयी झाले आहेत. पुण्याच्या विकासामध्ये बापट यांची भूमिका महत्त्वाची राहील. 
- दिलीप कांबळे, राज्यमंत्री

गिरीश बापट यांचा पुण्यातून जोरदार विजय झाला आहे. त्यामध्ये वडगाव शेरीतून मोठे मताधिक्‍य मिळाले आहे. आत्तापर्यंत केलेल्या कामाची पावती देत पुणेकरांनी पुन्हा एकदा विकासाला कौल दिला आहे. 
- जगदीश मुळीक, आमदार

गिरीश बापट यांना कोथरूड मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्‍य देण्याचे वचन दिले होते, ते आम्ही पूर्ण केल्याचा आनंद आहे. गिरीश बापट हे शहरातील प्रश्‍न सोडवून नवीन प्रकल्पही पूर्णत्वास नेऊन विकास करतील, असा विश्‍वास आहे. 
- मेधा कुलकर्णी, आमदार

गिरीश बापट यांना जेव्हा उमेदवारी जाहीर झाली, तेव्हाच त्यांचा विजय निश्‍चित झाला होता. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि पक्षाचे संघटन यामुळे हा विक्रमी विजय झाला आहे. 
- माधुरी मिसाळ, आमदार

तरुण म्‍हणतात
देशात मोदी सरकारने चांगली विकासकामे केली आहे. ते पाहूनच मी लोकसभा निवडणुकीत मतदान केले. नवनिर्वाचित खासदारांनी शहरातील वाहतुकीच्या आणि पाण्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे.
- हर्षिता वागळे

पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांनी चांगले काम केले होते. तसेच काँग्रेसकडेही सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे आपोआपच बापट सर्वांसाठी योग्य उमेदवार होते. शहरातील समस्या सोडविण्याबाबत बापट चांगले काम करतील.
- विक्रम मोरे 

मोदी सरकारबद्दल लोकांच्या मनात प्रचंड अपेक्षा आहे. आमदार म्हणून गिरीश बापट यांचे काम चांगले असून, यापुढेही चांगले काम करतील, असा विश्‍वास वाटतो.
- संजय मोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Girish Bapat MP Delhi Politics