भाजपकडून युतीचा प्रस्ताव

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जुलै 2016

महापालिका निवडणुकीत विजयासाठी रणनीतीची आखणी सुरू
पिंपरी - आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेसमोर युतीचा औपचारिक प्रस्ताव ठेवला जाणार आहे. महापालिकेच्या सत्तेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसला पायउतार करण्यासाठी ही युती गरजेची असल्याची मानसिकता भाजप पदाधिकाऱ्यांची झाली आहे.

महापालिका निवडणुकीत विजयासाठी रणनीतीची आखणी सुरू
पिंपरी - आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेसमोर युतीचा औपचारिक प्रस्ताव ठेवला जाणार आहे. महापालिकेच्या सत्तेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसला पायउतार करण्यासाठी ही युती गरजेची असल्याची मानसिकता भाजप पदाधिकाऱ्यांची झाली आहे.

आम्ही विकास करणार आणि राष्ट्रवादीचा चुकीचा कारभार जनतेसमोर मांडणार, या दोन प्रमुख मुद्‌द्‌यांवर निवडणुकीची व्यूहरचना ठरणार असल्याचे शुक्रवारी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. प्रदेश चिटणीस उमा खापरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, एकनाथ पवार आदी उपस्थित होते. पिंपरी येथील मेघाजी लोखंडे कामगार भवन येथे भाजपची बैठक झाली. त्यामध्ये यावर सांगोपांग चर्चा झाली. केंद्रीय मंत्रिमंडळात प्रकाश जावडेकर, डॉ. सुभाष भामरे, रामदास आठवले यांचे झालेले खातेवाटप, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बैठकीत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

खासदार साबळे म्हणाले, ‘भाजप आगामी महापालिका निवडणूक जिंकण्याच्या मनःस्थितीत आहे. "राष्ट्रवादी हटाव-महापालिका बचाव‘ हा नारा घेऊन आम्ही यापुढे काम करणार आहोत. भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष यांची महायुती व्हावी, असे आम्हाला वाटते. राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापालिका सत्तेतून हटविण्याचे प्रमुख उद्दिष्ट आमच्यासमोर आहे. शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव संमत झाल्यानंतर जागावाटपाची बोलणी होईल. युतीबाबतचा प्रस्ताव भाजपतर्फे शिवसेनेकडे प्रथमच ठेवला जाईल. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेला चुकीचा कारभार जनतेसमोर आणण्यावर आमचा प्रमुख भर राहणार आहे. महायुतीच्या एकत्रित जाहिरनाम्यातून आम्ही शहरात काय विकास करणार, हे मांडणार आहोत.‘‘

जगताप म्हणाले, ‘शहरात सर्वत्र सारखाच विकास व्हायला हवा होता. सध्या झालेला विकास म्हणजे ही वरवरची सूज आहे. ठराविक भागातच विकास झाला आहे. हे चित्र आम्हाला बदलायचे आहे.‘‘

एकत्र संसाराच्या मनःस्थितीत - साबळे
‘महापालिका निवडणुकीत युती करण्याच्या दृष्टीने भाजप विचार का करीत आहे,‘‘ याबाबत पत्रकारांनी छेडले असता साबळे म्हणाले, ‘आम्ही एकत्र संसार करण्याच्या मनःस्थितीत आहोत.‘‘ त्यावर पत्रकारांनी प्रतिप्रश्‍न विचारला, ‘अजून तुमचे लग्न (युती) कोठे झाले आहे?‘‘ त्यावर स्मितहास्य करीत साबळे म्हणाले, ‘आमची एकत्र येण्याची प्रामाणिक इच्छा आहे.‘‘ भाजपशी इतर पक्षांतील कोण संपर्कात आहेत, या प्रश्‍नावर मात्र "नो कॉमेंट्‌स‘ असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले. आमदार महेश लांडगे भाजपच्या संपर्कात आहेत का, या प्रश्‍नावरदेखील खासदार व आमदार या दोघांनीही सूचक हास्य केले.

आम्हाला श्रेय नको
‘चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन व्हावे, अशी आमची मागणी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्मारकाच्या मुद्द्यावरून श्रेयवाद निर्माण केला. आम्हाला कोणतेही श्रेय घ्यायचे नाही. आम्ही संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत,‘‘ असे खासदार साबळे यांनी स्पष्ट केले.

विधानसभानिहाय जबाबदारी
* चिंचवड : लक्ष्मण जगताप, उमा खापरे.
* पिंपरी : अमर साबळे, सदाशिव खाडे.
* भोसरी : ऍड. सचिन पटवर्धन, एकनाथ पवार.

Web Title: BJP Grand proposal