अजित पवारांचा असा अपमान पाहिला नाही : तावडे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

जेएनयूमध्ये सध्या सुरू असलेले आंदोलन हे षड्यंत्र असून विद्यार्थ्यांना पुढे केले जात आहे.

पिंपरी : ''संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'स्टेफनी' असे संबोधले. तरीही त्यांचे समर्थक गप्प कसे, खुर्चीचा इतका मोह असू शकतो का? अजितदादांचा अशाप्रकारचा अपमान मी राजकीय आयुष्यात अद्यापपर्यंत पाहिला नाही. त्यामुळे दादा खरचं स्टेपनी आहेत की मेनव्हील आहेत, हे सांगाव,'' असा खोचक टोला माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकता सुधारणा विधेयकाबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी कॅम्पातील बी.टी. आडवाणी धर्मशाळा येथे आयोजित मेळाव्यात तावडे बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, 'नागरिकता सुधारणा विधेयकाबाबत विरोधकांकडून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून मुस्लिम समाजालाही जाणीवपूर्वक घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.' राजकीयदृष्ट्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

- Video : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले... 

तावडे म्हणाले, या कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार असल्याचा चुकीचा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. यात कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्याचा विषयच नाही. उलट जे मूळ भारताचेच होते, जे अल्पसंख्याक आहेत त्यांचा यामध्ये विचार केला गेला आहे. काहीजण चुकीचा संदेश पसरवत आहेत. भाजप मुस्लिमांच्या विरोधात नाही. विरोधकांना मोदी सरकारचे चांगले काम कही जणांना पाहवत नाही. वारंवार चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या जात असून या कायद्याबाबत जाणीवपुर्वक नागरिकांमध्ये भिती पसरवली जात आहे. राजकीयदृष्ट्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधक करताहेत. यासाठी भाजपने देशव्यापी मोहिम सुरू केली असल्याचे तावडे यांनी नमूद केले. 

- पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांची बदली; नवे अध्यक्ष कोण?

जेएनयूमध्ये सध्या सुरू असलेले आंदोलन हे षड्यंत्र असून विद्यार्थ्यांना पुढे केले जात आहे. मोदी सरकारला खुलेपणाने विरोध करता येत नसल्याने खोट्यापणाने विरोध करण्याचे काम काही विरोधक करीत असल्याची टीकाही तावडे यांनी केली.

दरम्यान, मेळाव्यानंतर तावडे यांच्या नेतृत्वात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी पिंपरी कॅम्प परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी तावडे यांनी गुरूद्वाराला भेट दिली.

- PIFF : मराठीत 'आनंदी गोपाळ', तर ट्युनिशियाचा 'अ सन' सर्वोत्कृष्ट!

यावेळी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक संदीप वाघेरे, राजेश पिल्ले, अनुप मोरे, माजी शहराध्यक्ष दादा पामनानी, कमल मलकानी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संदीप वाघेरे यांनी केले. सूत्रंसचलन वैशाली खाडे यांनी केले तर दादा पामनानी यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Vinod Tawde criticized deputy CM Ajit Pawar