पिंपरीत भाजपमध्ये दुफळी;साबळे,पटवर्धन यांचे पुतळे जाळले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

या आंदोलनामुळे स्विकृत सदस्य निवडीवरून पक्षात जगताप विरुद्ध साबळे व पटवर्धन अशी उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. यावेळी जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

पिंपरी - स्विकृत नगरसेवक पदासाठी खासदार अमर साबळे व ऍड.सचिन पटवर्धन यांनी सुचविलल्या नावांना आक्षेप घेत भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांनी शनिवारी भाजप शहर कार्यालयाबाहेर निदर्शने करत साबळे व पटवर्धन यांचे पुतळे जाळले, तसेच कार्यालयातील फलकावर असलेल्या दोघांच्याही छायाचित्रांना काळे फासले.

या आंदोलनामुळे स्विकृत सदस्य निवडीवरून पक्षात जगताप विरुद्ध साबळे व पटवर्धन अशी उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. यावेळी जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. 

पक्षाचे सरचिटीस प्रमोद निसळ यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजता असंतुष्ट कार्यकर्त्यांची बैठक शहर कार्यालयात बोलावली. त्यावेळी महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार,नगरसेवक नामदेव ढाके,शीतल शिंदे,सुजाता पालांडे, राजू दुर्गे, महेश कुलकर्णी,अनुप मोरे, राजेश पिल्ले, बिभिषण चौधरी, दिलीप कुलकर्णी, अमीत गोरखे,अजय पाताडे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

बैठकीच्यावेळी सुरवातीलाच राजू दुर्गे यांनी ही बैठक प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून विरोधकांनी राज्यात त्यांच्या विरोधात जे निषेधसत्र चालविले आहे. त्याविरोधात आपणही प्रतिक्रीया देण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगून पक्षातील अंतर्गत गटबाजीवर हल्ला चढविला. खासदार अमर साबळे व राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड.सचिन पटवर्धन यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

Web Title: bjp leaders internal dispute in pimpri chinchwad