भाजपच्या हजारी प्रमुखांची भरणार पुण्यात 'शाळा'

अमित गोळवलकर
शनिवार, 14 जानेवारी 2017

अशी आहे हजारी यंत्रणा
भाजपच्या निवडणूक यंत्रणेत हजारी प्रमुख हा महत्त्वाचा घटक मानला जातो. हजार जणांच्या मतदार यादीसाठी एका व्यक्तीची हजारी प्रमुख म्हणून नेमणूक केली जाते. या हजार मतदारांपर्यंत पक्षाची पत्रके, मतदानाआधीच्या स्लीपा पोहोचविण्याची जबाबदारी या हजारी प्रमुखांवर असते. शहरात सध्या 41 प्रभाग आहेत. या निवडणुकीसाठी 2700 हजारी याद्या तयार करण्यात आल्या आहेत. थोडक्यात उद्याच्या शाळेची पटसंख्या ही 2700 असणार आहे.

पुणे - हजारी प्रमुख हा भाजपच्या निवडणूक यंत्रणेतला महत्त्वाचा घटक. या पक्षाने याच कार्यकर्त्यांच्या जोरावर अनेक निवडणुका जिंकल्या. आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना भाजपनं या हजारी प्रमुखांना अधिक सज्ज बनविण्याचं ठरवलं असून उद्या (रविवारी) पक्षातर्फे या हजारी प्रमुखांची 'शाळा' घेण्यात येणार आहे. खऱ्या शाळेच्या वर्गाप्रमाणेच या अर्ध्या दिवसाच्या शाळेचे वर्ग होणार असून 'विद्यार्थ्यांना' गणवेष सक्तीचा आहे किंवा नाही, याबद्दल मात्र पक्षानं काही सांगितलेलं नाही.

न्यू इंग्लिश स्कूल, टिळकरोड या शाळेत ही भाजपची शाळा उद्या ठीक अकरा वाजता भरणार आहे. अकरा वाजता घंटा वाजल्यावर सर्व हजारी प्रमुख आपापल्या वर्गात जाऊन बसतील. शाळेतल्या 41 वर्गांत ही तीन तासांची शाळा सुरु होईल. त्या आधी हजारी प्रमुखांची नावनोंदणी करुन त्यांना ओळखपत्रे दिली जातील. उशीरा आलेल्या 'विद्यार्थ्यांना' बाकावर उभे करणार की त्यांना वर्गात बसू दिले जाणार, हे देखिल पक्षाने स्पष्ट केलेले नाही.

शाळेच्या अभ्यासाची सुरुवात राष्ट्रगीतानं होणार आहे. त्यानंतर सर्व 'विद्यार्थी' एकसुरात 'भारत माझा देश आहे...' ही प्रतिज्ञा म्हणतील आणि पहिला तास सुरु होईल. 'विद्यार्थी' अभ्यासाला कंटाळू नयेत म्हणून वर्गशिक्षक त्यांना प्रथम एक बोधकथा सांगतील आणि मग प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात होईल. पहिला तास असेल तो हजारी यादीचे काम कसं करायचं, याचा.

मग दुसरा तास सुरु होईल. हा तास असेल सोशल मिडियावरच्या अभ्यासाचा. तिसरा तास होईल निवडणुक आचारसंहितेच्या अभ्यासाचा. मग वर्गातली शाळा संपून 'विद्यार्थी' 'असेंब्ली' साठी शाळेच्या मैदानात रांगेतून जातील आणि शिस्तीनं प्रभागनिहाय व हजारी यादी क्रमांकानुसार केलेल्या बैठक व्यवस्थेत जाऊन बसतील. मैदानावरच्या या तासात माझं पुणं, स्मार्ट पुणं मिशन २०१७ या मतदार यादीच्या सॉफ्टवेअरचं अनावरण होणार आहे आणि ते कसं वापरायचं याची माहितीही देण्यात येणार आहे. 

या शाळेचे हंगामी मुख्याध्यापक आणि भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश हे या कार्यक्रमात 'विद्यार्थ्यांना' मार्गदर्शन करतील. या संपूर्ण शाळेच्या कामकाजात पालकमंत्री गिरीष बापट, भाजपच्या शहर शाखेचे सध्याचे 'हेडमास्तर' योगेश गोगावले, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे आणि पक्षाचे सर्व आमदार वर्गशिक्षक आणि पर्यवेक्षकांची भूमिका निभावणार आहेत. शाळेची मधली सुटी कधी होणार आणि या सुटीत 'विद्यार्थ्यांनी' डबे आणायचे आहेत की नाही, याच्या मात्र सूचना मिळालेल्या नाहीत. 

अशी आहे हजारी यंत्रणा
भाजपच्या निवडणूक यंत्रणेत हजारी प्रमुख हा महत्त्वाचा घटक मानला जातो. हजार जणांच्या मतदार यादीसाठी एका व्यक्तीची हजारी प्रमुख म्हणून नेमणूक केली जाते. या हजार मतदारांपर्यंत पक्षाची पत्रके, मतदानाआधीच्या स्लीपा पोहोचविण्याची जबाबदारी या हजारी प्रमुखांवर असते. शहरात सध्या 41 प्रभाग आहेत. या निवडणुकीसाठी 2700 हजारी याद्या तयार करण्यात आल्या आहेत. थोडक्यात उद्याच्या शाळेची पटसंख्या ही 2700 असणार आहे.

Web Title: BJP leaders meet in Pune