पिंपरी-चिंचवडचे शांघाय करणार - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पिंपरी - गेल्या तीस वर्षांत हजारो कोटी रुपयांचा निधी आल्यावर पिंपरी-चिंचवडचे पूर्ण पानच सोन्याचे व्हायला हवे होते; मात्र राज्यकर्त्यांनी मलिदा खाल्ल्यामुळे केवळ सोन्याची किनार देऊ शकले. येत्या पाच वर्षांत विकास आराखड्यातील उर्वरित ८५ टक्‍के आरक्षणांचा विकास करून शहराचे शांघाय करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पारदर्शक जाहीरनाम्यातील मनोगतातून शहरवासीयांना दिले आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासून ते आजतागायत शहराच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षित विकास झाला नाही. तो निधी राज्यकर्त्यांनी हडप केला.  एवढा निधी आल्यावर शहराचा पूर्ण कायापालट व्हायला हवा होता; मात्र तसे झाले नाही. महापालिकेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी महापालिका सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा अशा महत्त्वाच्या समित्यांचे थेट प्रक्षेपण करून महापालिका भ्रष्टाचारमुक्‍त करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मनोगतात म्हटले आहे.

बारामतीचा रिमोट संथगतीने चालल्यामुळे केवळ १५ टक्‍के आरक्षणांचाच विकास झाला आहे. भाजपची सत्ता आल्यास सर्व कारभार ऑनलाइन करून एक खिडकी योजना, तसेच सारथीचे पुनरुज्जीवन केले जाईल. सर्व प्रभागांमध्ये ई-सेवा केंद्र सुरू करून ‘शासन आपल्या दारी’ शेवटच्या घटकांपर्यंत सर्व योजना व सुविधा पुरविण्यात येईल. दिशाहीन झालेली दळणवळण यंत्रणा अत्याधुनिक करून संपूर्ण शहरात मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल. प्रत्येक प्रभागामध्ये महिलांसाठी दुर्गंधीमुक्त अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय बनविण्यात येणार असून, निर्भया ॲपसारख्या ॲप्लिकेशनचा वापर करून भयमुक्‍त पिंपरी-चिंचवड केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीप्रमाणे एकछत्री अंमल राखण्यासाठी सर्व शासकीय इमारती एकाच छताखाली आणण्याचा मानस आहे. या महापालिकेच्या निवडणुकीत सर्व विरोधकांना केवळ पराभूत नव्हे, तर नेस्तनाबूत करा. केंद्र, राज्यात भाजपचे सरकार असल्याने महापालिकेतही भाजप आणून विकासाचा त्रिवेणी संगम साधून शहराचे रूपांतर शांघायमध्ये होण्यासाठी भाजपला विजयी करून खऱ्याअर्थाने पारदर्शक विकासाच्या विश्‍वात रममाण व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांना केले आहे.

Web Title: Bjp manifesto