भाजपचा जाहीरनामा 27 जानेवारीला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा 27 जानेवारीच्या सुमारास प्रसिद्ध होणार आहे, तर 41 प्रभागांचे स्वतंत्र जाहीरनामे 8 फेब्रुवारीच्या सुमारास जाहीर करण्यात येणार आहेत. शहरातील वाहतूक, कचरा, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आदी समस्या सोडविण्यासाठीचा हा मास्टर प्लॅन असेल, असा दावा पक्षाने केला आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने 26 डिसेंबर रोजी प्रारूप जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावर नागरिकांनी सूचना कराव्यात. त्यांचा समावेश करून अंतिम जाहीरनामा प्रकाशित करण्यात येईल, असे पक्षाने जाहीर केले होते. शहरातील बचत गट, ज्येष्ठ नागरिकांचे गट, विविध अभ्यास गट, स्वयंसेवी संस्थांकडून सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक सूचना जाहीरनाम्यासाठी आल्या आहेत. त्याच्या आधारे तयार झालेला जाहीरनामा 27 जानेवारीच्या सुमारास प्रसिद्ध होणार आहे. जाहीरनामा तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु युतीसाठी शिवसेनेबरोबर सध्या बोलणी सुरू असल्यामुळे पुढील आठवड्यात जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. शिवसेनेचा जाहीरनामा स्वतंत्र असेल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. 

शहरात 41 प्रभाग आहेत. त्या त्या प्रभागांच्या गरजांनुसार त्यांचे स्वतंत्र जाहीरनामे पक्षाकडून तयार करण्यात येत आहेत. संबंधित प्रभागांतील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा, मोकळ्या जागांचा अभाव आदी समस्यांचे निराकरण त्या जाहीरनाम्यात करण्यात येणार आहे. पक्षाचे त्या त्या प्रभागांतील उमेदवार निश्‍चित झाल्यावर प्रभागांचे जाहीरनामे प्रकाशित करण्यात येणार आहेत, असे पक्षाकडून सांगण्यात आले. 

शहराला दिलासा देणारे धोरण 
सक्षम सार्वजनिक वाहतूक, शुद्ध आणि समान पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र धोरण, पादचाऱ्यांना सुरक्षितता, कचऱ्याचे शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन, महिला-युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा, झोपडपट्टीवासीयांना दिलासा देणाऱ्या धोरणांचा जाहीरनाम्यात समावेश असेल, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: BJP manifesto on January 27