पीएमपीच्या 50 मार्गांवर मोफत प्रवास 

पीएमपीच्या 50 मार्गांवर मोफत प्रवास 

पुणे - शहरातील 50 मार्गांवर महिला, कामगार आणि दुर्बल घटकांसाठी मोफत पीएमपीसेवा, मेट्रो प्रकल्पाला गती, सक्षम पीएमपी, वर्तुळाकार रस्त्याला प्राधान्य, वाय- फाय शहर, पुण्याचा पाणी कोटा राज्य सरकारकडून वाढवून घेणार, शहराला 24 तास पाणीपुरवठा, नागरी सुविधांसाठी ऍमिनिटी स्पेसचा नावीन्यपूर्ण संकल्पनांद्वारे वापर, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी पाच वर्षांत 50 हजार घरे, महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या वाढविणार आदी घोषणा भारतीय जनता पक्षाच्या महापालिका निवडणूक जाहिरनाम्यात करण्यात आल्या. 

या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, पक्षाचे सरचिटणीस उज्ज्वल केसकर, गणेश घोष आदी उपस्थित होते. 

गोगावले म्हणाले, ""पक्षाने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा केवळ सोपस्कार नाही; तर वचननामा आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पक्षसंघटना बांधिल असून त्यासाठी समिती नियुक्त केली आहे. येत्या चार दिवसांत शहरातील सर्व (41) प्रभागांसाठी स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध होतील.'' 

बापट म्हणाले, ""स्मार्ट सिटीतंर्गत सर्वच प्रकल्पांना चालना देणार असून, नदीसुधारणेसाठी विविध उपाययोजनांबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी टेकड्या आणि मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करणार, शहरी भागातही जलशिवार योजना राबविणार, सर्व शासकीय इमारतींमध्ये पर्जन्य जलसंचय करणार आणि सौरऊर्जेला चालना देण्यात येईल. केंद्र सरकारच्या अमृत आवास योजनेतून झोपडपट्टीवासीयांना पाच वर्षांत 50 हजार हक्कांची घरे देण्यात येणार असून त्याची सुरवात हडपसरपासून होईल. पहिल्या टप्प्यात 10 हजार घरे उभारण्यात येणार आहेत.'' 

अन्य प्रमुख घोषणा 
- शहरातील प्रत्येक प्रभागात एक ते दोन क्षमतेचे ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार 
- ज्येष्ठ नागरिक, महिलांना सवलतीमध्ये आरोग्य सेवा देणार 
- महापालिकेच्या माध्यमातून स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय उभारणार 
- ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारच्या योजनांतून नियमित आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करून देणार 
- पंतप्रधान स्वयंरोजगार योजना राबविणार 
- प्रत्येक प्रभागात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणार 
- पर्यटनाचे हब म्हणून शहराची ओळख निर्माण करणार 
- प्रत्येक प्रभागात योग केंद्र सुरू करणार 
- शिक्षण मंडळाच्या खरेदीत पारदर्शकता आणणार 

"बीडीपी'वर सहमतीने निर्णय 
जैववैविध्य आरक्षण (बीडीपी) असलेल्या क्षेत्रावर 8 ते 12 टक्‍क्‍यांपर्यंत बांधकामाला परवानगी देण्याचा निर्णय राजकीय सहमतीने घेतला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. शहरातील क्रीडागणांची संख्या वाढविण्यावर आगामी काळात भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ऍमिनिटी स्पेसवर नागरी सुविधा 
शहरातील 731 ऍमिनिटी स्पेसचा वापर केवळ समाजमंदिरे किंवा वाचनालयासाठी करण्याऐवजी तेथे छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता येतील; तसेच पाण्याचा फेरवापर करण्याचे छोटे प्रकल्पही त्या जागांवर उभारण्यात येतील. या जागांवर नागरी सुविधा उपलब्ध करून देणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com