Loksabha 2019 : युतीला राज्यात 45 जागा मिळतील: चंद्रकांत पाटील

मिलिंद संगई
रविवार, 7 एप्रिल 2019

बापट जोशींच्या मैत्रीचा उल्लेख
सांगलीत वसंतदादांच्या नातवाला बॅट हाती घ्यावी लागते, पुण्यात गिऱीश बापटांचे परममित्र मोहन जोशी हे उमेदवार आहेत, जोशी हे सकाळी बापटांकडे चहा पिऊनच प्रचाराला बाहेर पडत असतील, असे असेल तर कॉंग्रेस उरलीच कुठे असा सवाल करत राष्ट्रवादीच प्रमुख विरोधक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

बारामती : भाजप शिवसेना युतीला राज्यात किमान 45 जागा मिळतील, यंदा बारामतीसह माढा व हातकणंगलेचीही जागा आम्ही खेचून आणू असा विश्वास भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला. 

चंद्रकांत पाटील यांनी आज पहाटे सहा वाजल्यापासूनच बारामती शहरात आपला दौरा सुरु केला. सातारावरुन पहाटे चार वाजता निघून पाटील सहाच्या सुमारास बारामतीत पोहोचले. शहरातील अशोकनगरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये त्यांनी तासभर व्यतित केला, संघ कार्यकर्त्यांशी त्यांनी सुसंवाद साधला. 

त्या नंतर शहरातील काही कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा गाठी भेटी, शिवसेना पक्ष कार्यालयाचे उदघाटन व त्या पाठोपाठ सेना व भाजप कार्यकर्त्यांशी त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला. या संवादादरम्यान सकाळने त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. 
बारामतीची जबाबदारी पक्षाने आपल्यावर दिलेली नाही, आपण ती मागून घेतलेली आहे, असा महत्वाचा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी या संवादादरम्यान केला.

बारामतीत खरोखरीच परिवर्तन होऊ शकेल का...असे विचारता...शंभर टक्के...बारामतीतील परिवर्तनबाबत माझ्या मनात शंकाच नाही, असे लोकही कंटाळलेले आहेत, भाजपच्या मतदारांना या पूर्वी खात्री वाटत नव्हती, यंदा मात्र ही लढत खरी आहे, असे वाटत असल्याने मला हा विश्वास वाटतो, असे पाटील म्हणाले. 
48 जागा जिंकणे हा थोडा मोठा दावा असेल पण 45 पेक्षा खाली आम्ही येणार नाही, बारामती, माढा व हातकणंगले या जागा आम्ही या वेळेस जिंकलो तर कोणाला आश्चर्य वाटायला नको असे ते म्हणाले. 

सेना भाजपचा मतदार हा युती होण्याचीच वाट पाहत असतो, नेत्यांचे मनोमीलन झाले आहे, त्या मुळे मतदार हा आमच्याच उमेदवारांना मतदान करेल, तो कधीच कॉंग्रेस व राष्ट्रवादीला मतदान करणार नाही या बद्दल माझ्या मनात शंका नाही. 

राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले, या बाबत बोलताना पाटील म्हणाले की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये त्याचे मत मांडण्याचा अधिकार असतो, आपल्याइतकी प्रगल्भ लोकशाही कोठेही नाही, मात्र याच राज ठाकरे यांना गुजरातचा विकास आवडला होता मात्र आता त्यांचे मतपरिवर्तन झाले आहे. मोदी आणि शहा राष्ट्रापुढील संकट आहे, हे ठाकरे यांचे मत आहे, सामान्य माणूस आज मोदी शहा यांच्याच सोबत उभा आहे. 

गांधी कुटुंबानंतर आता पवार कुटुंबाला भाजपने लक्ष्य केले, या बाबत विचारता ते म्हणाले, मूठभर ताकदीच्या आधारे त्यांनी राज्य चालविले, विरोधक म्हणून भाजपलाच त्याचा राग आहे अस नाही तर कॉंग्रेसलाही तो आहे. राज्यातील उरलेली कॉंग्रेसही या निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने संपविली आहे, राज्यातील कॉंग्रेस ही राष्ट्रवादीच चालविते अशी स्थिती सध्या आहे. कोणाला शिल्लकच ठेवायच नाही ही राष्ट्रवादीची परंपरा आहे, फेअर राजकारण करायचेच नाही असा त्यांचा इतिहासच आहे. अनफेअर राजकारण संपवायचे असेल तर राष्ट्रवादी संपविल्याशिवाय पर्याय नाही, त्या मुळे राष्ट्रवादीला विरोधक समजूनच आम्ही काम करतोय. 

बापट जोशींच्या मैत्रीचा उल्लेख
सांगलीत वसंतदादांच्या नातवाला बॅट हाती घ्यावी लागते, पुण्यात गिऱीश बापटांचे परममित्र मोहन जोशी हे उमेदवार आहेत, जोशी हे सकाळी बापटांकडे चहा पिऊनच प्रचाराला बाहेर पडत असतील, असे असेल तर कॉंग्रेस उरलीच कुठे असा सवाल करत राष्ट्रवादीच प्रमुख विरोधक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

Web Title: BJP minister Chandrakant Patil predictions BJP shivsena seat wins in Loksabha election