स्थानिक पातळीवरही इच्छुकांकडून कुरघोड्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पिंपरी - सध्या भाजप व राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे नाट्य रंगले आहे. मात्र, स्थानिक पातळीवरही प्रतिस्पर्धी उमेदवारावर कुरघोड्या करून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना अडविण्याचे प्रयत्न होत आहेत. असाच एक प्रकार नुकताच नेहरूनगर परिसरात घडला. 

पिंपरी - सध्या भाजप व राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे नाट्य रंगले आहे. मात्र, स्थानिक पातळीवरही प्रतिस्पर्धी उमेदवारावर कुरघोड्या करून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना अडविण्याचे प्रयत्न होत आहेत. असाच एक प्रकार नुकताच नेहरूनगर परिसरात घडला. 

नेहरूनगर प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या एका नगरसेवकांकडे चालक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे पिस्तूल असून, त्याने विठ्ठलनगर परिसरात गोळीबार केल्याची माहिती एकाने पिंपरी पोलिसांना दिली. गोळीबारासारखा गंभीर प्रकार असल्याने मग पोलिसही कामाला लागले. ज्याने गोळीबार केल्याची माहिती मिळाली, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, आपल्याकडे कोणतेही पिस्तूल नाही. तसेच आपण गोळीबारही केला नसल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्या कार्यकर्त्यांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने पोलिसांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही. 

पोलिसांना मग ज्या ठिकाणी गोळीबार केल्याचे समजले. त्या भागात चौकशीला सुरवात झाली. हा गोळीबार रात्री झाल्याने कोणीही दुकानदार साक्षीला नव्हता. मात्र, त्या भागात रात्री रस्त्यावर गप्पा मारत बसणाऱ्या टोळक्‍याला; तसेच आसपासच्या रहिवाशांना गोळीबाराबाबत विचारणा केली. मात्र, आम्ही रात्री दोनपर्यंत या भागात बसलो असून, गोळीबाराचा प्रकार घडला नाही. आवाजही ऐकला नाही. पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी करूनही गोळीबार झाल्याचे कोणीच सांगितले नाही. 

इच्छुक उमेदवारानेही पोलिसांशी संपर्क साधला. मला तुमच्या तपासाआड यायचे नाही. मात्र, निवडणुका जवळ आल्याने माझ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी असे प्रकार घडत आहेत. आमची आपणास विनंती आहे, की खात्री करून मगच कारवाई करा. त्यामुळे ज्या खबऱ्याने गोळीबाराची बातमी दिली. आता पोलिसांनी त्याच्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. खोटी बातमी देणाऱ्याची पोलिस चौकशी करीत आहेत.

Web Title: bjp-ncp politics