भाजपच्या ‘व्हीप’ला राष्ट्रवादीचा ‘खो’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

मंजूर झालेले विषय

  • देहूरोड-कात्रज बाह्यवळण (मुंबई-बंगळूर महामार्ग) मार्गाच्या ताथवडेपासून वाकड येथील मुळा नदीपर्यंत दोन्ही बाजूस १२ मीटर रुंद सेवारस्ता विकसित केला जाणार आहे. त्यामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना नुकसानभरपाई देऊन भूसंपादनास मान्यता
  • दिघी-आळंदी रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या दिघीतील नागरिकांना पर्यायी घरकूल देण्याचा आणि कुदळवाडी, सांगवीसह अन्य भागातील रस्तेरुंदीकरणामुळे बाधितांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचा विषय उपसूचनेद्वारे मंजूर 
  • महापालिकेच्या वैद्यकीय विभागात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सौरभ गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. राजेंद्र फिरके यांच्या नियुक्तीस मान्यता
  • घरे, दुकाने, दवाखाने, गोदामे, रुग्णालये, हॉटेल्स, शैक्षणिक व धार्मिक संस्था, वेगवेगळी कार्यालये, चित्रपटगृहे आदी ठिकाणांचा कचरा संकलनासाठी प्रतिमहा शुल्क आकारण्यासाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याचा विषय दप्तरी दाखल. मात्र, अंमलबजावणी सुरूच राहणार

पिंपरी  - महापालिका सर्वसाधारण सभेत कोणते विषय मंजूर, कोणते तहकूब व कोणते दप्तरी दाखल करावेत, याबाबतचा ‘व्हीप’ सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काढला होता. त्यात चिखली येथील जागा चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्टला देण्याचा विषय मंजूर करायचा होता. मात्र, विरोधकांनी आक्षेप घेऊन सविस्तर माहिती मागितल्याने सदर विषय तहकूब करण्याची वेळ भाजपवर आली.

चिखली गट क्रमांक १६५५/२ मधील जागा गुरांच्या गोठ्यासाठी आरक्षित आहे. ती जागा चंद्रभागा ट्रस्टला गोशाळा चालविण्यास देण्याचा विषय सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी होता. मात्र, ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांनी जागेचे क्षेत्र, किती वर्षांसाठी जागा देणार, तिथे काय सुविधा असणार, याची सविस्तर माहिती मागितली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी माहिती दिली. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने विरोधकांनी विषय तहकूब करण्याची मागणी केल्याने सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सदर विषय पुढील सभेपर्यंत तहकूब करण्याची सूचना मांडली. ती महापौर राहुल जाधव यांनी मान्य केली.  

कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
शहरात कुत्र्यांची संख्या वाढली असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची व पशुवैद्यकीय विभागाला पुरेसे मनुष्यबळ देण्याची मागणी सदस्यांनी केली. यावरील चर्चेत वैशाली काळभोर, संदीप वाघेरे, मंगला कदम, नितीन काळजे, संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे आदींनी सहभाग घेतला. 

डुकरांच्या मालकांकडून हल्ला
शहरातील मोकाट कुत्री पकडून त्यांची नसबंदी केली जाते व त्यांच्या मूळ भागात सोडले जातात. डुकरे पकडण्याचे काम तमिळनाडूतील संस्थेला दिले आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांत २३३ डुकरे पकडली. मात्र, त्यांच्या मालकांकडून कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याने त्यांनी कारवाई थांबविल्याचे डॉ. दगडे यांनी सांगितले. डुकरांच्या मालकांवर कारवाई करण्याबाबत मात्र कोणीही बोलले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP NCP Politics Municipal