भाजप सरकारला घरी बसविण्याची वेळ - संग्राम कोते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पौड - केंद्र आणि राज्य सरकारने साडेचार वर्षांत मोठमोठ्या घोषणा करीत जाहिरातींवर अमाप खर्च केला. जातीपातीचे राजकारण करून विकासाच्या मूळ मुद्याला बाजूला सारत तरुणांची डोकी भडकविण्याचे काम हे सरकार करीत आहे. त्यामुळे आता या सरकारला घरी बसविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पक्षाच्या बाजूने युवक संघटनांनी ताकदीने उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी पौड (ता. मुळशी) येथे केले.

मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सरकारच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात पौडला तहसील कचेरीवर जनआक्रोश आंदोलन केले. त्या वेळी कोते बोलत होते. या वेळी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, सुभाष अमराळे, रवींद्र कंधारे, कोमल साखरे, कोमल वाशिवले, राधिका कोंढरे, दीपाली कोकरे, सुनील चांदेरे, अंकुश मोरे, विजय येनपुरे, सुनील वाडकर, निखिल मारणे, धैर्यशील ढमाले, सतीश सुतार, गणेश पवळे, स्मिता जांभूळकर, सुखदेव कोळेकर, विशाल चौधरी उपस्थित होते. तालुका अध्यक्ष नीलेश पाडाळे, कार्याध्यक्ष विलास अमराळे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.

घोटकुले म्हणाले, ‘‘या सरकारने आणलेला कौशल्य विकास कार्यक्रम पूर्णपणे फसवा आहे. आरक्षणांबाबत अनेकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली आहे. आतापर्यंत या सरकारने अडीचशेच्या वर योजना आणल्या. मात्र त्यातली एकही यशस्वी झाली नाही.’’ कोंढरे म्हणाले, ‘‘साडेचार वर्षापूर्वी जनता भूलथापांना बळी पडली. सध्या समाजातला कोणताही घटक सुखी नाही. इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना आपल्या हमीभावासाठी आंदोलन करावे लागले.’’ या वेळी चांदेरे, पाडाळे, विलास अमराळे यांची भाषणे झाली. रामदास पायगुडे यांनी आभार मानले.

राज्यात तेरा लाख युवक स्पर्धा परीक्षा देत असताना गेल्या साडेचार वर्षांत केवळ चारशे अधिकाऱ्यांची भरती या सरकारने केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून सर्वसामान्यांना वास्तवापासून दूर ठेवले आहे. भाजप-सेनेचा मंत्रीही तालुक्‍यात फिरकणार नाही एवढी ताकद तरुणांनी निर्माण केली पाहिजे.
- संग्राम कोते, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस 

Web Title: BJP NCP Politics Sangram Kote