Vidhan Sabha 2019 : लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना भाजपची उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

भारतीय जनता पक्षाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे; तर गतवेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले महेश लांडगे यांना या वेळी भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे.

विधानसभा 2019 
पिंपरी - भारतीय जनता पक्षाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे; तर गतवेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले महेश लांडगे यांना या वेळी भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे.

पिंपरीसाठी ॲड. गौतम चाबुकस्वार यांना शिवसेनेने ‘एबी’ फॉर्म दिला आहे. त्यामुळे महायुतीचा तिढा संपला आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे पत्ते अद्याप गुलदस्तात असून, विद्यमानांना टक्कर कोण देणार, याबाबत शहरात उत्सुकता वाढली आहे. 

भारतीय जनता पक्षाने मंगळवारी  (ता. १) उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात जगताप व लांडगे यांना संधी मिळाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. विजयी झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या वेळी निवडणुकीत भोसरीतून महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार, पक्षाचे नगरसेवक रवी लांडगे, ज्येष्ठ नेते प्रमोद निसळ यांनी उमेदवारी मागितली होती. यातील रवी यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज घेतले आहेत. त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास बंडखोरी होऊ शकते; तर चिंचवडमधून भाजपचे उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी उमेदवारी मागितली होती. शिवाय, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनीही उमेदवारी मागितली होती. २०१४ च्या निवडणुकीत कलाटे जगताप यांचे; तर पवार हे महेश लांडगे यांचे प्रतिस्पर्धी होते. आता युती झाल्याने कलाटे काय भूमिका घेतात, इच्छुकांचे वादळ शांत राहणार की बंडखोरी होणार, याबाबतच्या चर्चेलाही उधाण आले आहे. 

दरम्यान, पिंपरीसाठी शिवसेनेचे चाबुकस्वार यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र, येथून भाजपचे नऊ जण इच्छुक होते. भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) कार्यकर्त्या चंद्रकांता सोनकांबळे यांनीही अर्ज नेले आहेत. २०१४ ला त्या चाबुकस्वार यांच्या प्रतिस्पर्धी होत्या. पिंपरी मतदारसंघ भाजपने रिपब्लिकन पक्षासाठी सोडला होता. आता सोनकांबळे यांची भूमिका काय असणार, याबाबतही उत्सुकता आहे.

आदेश पाळणार की बंडखोरी?
आघाडीतील ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले. मात्र, काँग्रेसने पिंपरीची जागा मागितली आहे. अद्याप आघाडीची घोषणा झालेली नसल्याने व दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेलेले असल्याने तिढा वाढला आहे. पक्षाचा आदेश पाळला जाणार की बंडखोरी होणार, याकडेही लक्ष आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP nomination to Laxman Jagtap Mahesh Landge