भाजपमध्ये जुन्या-नव्यांचा वाद उफाळला

भाजपमध्ये जुन्या-नव्यांचा वाद उफाळला

पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश करून महिनाही उलटला नाही, तोच पक्षात जुन्या-नव्यांच्या वादाला तोंड फुटले आहे. महापालिकेची निवडणूक जेमतेम दोन महिन्यांवर असताना वादाची ठिणगी पडली आहे. भाजपमध्ये समांतर पार्टी चालविली जात असल्याचा जळजळीत आरोप आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी केल्याने शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी अवाक झाले आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी २८ नोव्हेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाकडे सुरवातीपासूनच पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे लक्ष्य होते. अनेकांनी प्रवेशाबद्दल खासगीमध्ये नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांशी थेट व जवळचे संबंध असल्याने कोणी या प्रवेशाविषयी परखडपणे किंवा उघडपणे बोलत नव्हते; पण आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याला डावलले जाईल या भीतीने ग्रासल्याने जुन्या कार्यकर्त्यांत धूस-फूस सुरू झाली आहे. त्याच ठिणगीने गुरुवारी पेट घेतल्याने भाजपमधील वाद उघडपणे समोर आला आहे.

येत्या शनिवारी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी राज्यातील पवित्र नद्यांचे जल व मृदा आणण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी पक्षाच्या वतीने सर्व जिल्हा शाखांना आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात भोसरी-चऱ्होली मंडलाचे अध्यक्ष संतोष लांडगे यांनी रवी लांडगे यांच्या भोसरी येथील कार्यालयात बैठक बोलावली होती. बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रत्येकी दोनशे कार्यकर्ते मुंबईच्या कार्यक्रमासाठी आणण्याची जबाबदारी देण्यात आली. ही बैठक चालू असताना पक्षात नव्याने दाखल झालेल्या आमदार महेश लांडगे समर्थकांसाठी एका खासगी हॉटेलमध्ये प्रशिक्षणवर्ग सुरू आहे. त्याकडे लक्ष वेधून बैठकीतील कार्यकर्त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप केला आणि मिळत असलेल्या वागणुकीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

या प्रकारामुळे भाजपच्या भोसरीतील जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्याच नेतृत्वाला घरचा आहेर दिला. अशाप्रकारे कार्यकर्त्यांना भडकविणाऱ्या या घटनेमागील बोलविता धनी कोण? याचा शोध घेतला जात असल्याचे पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

दिवसभर अनेक कार्यकर्ते भेटून जातात, त्यांच्या अडचणी ते मांडतात. भोसरीत दोन टप्प्यांत कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. ज्यांना पहिल्या टप्प्यात संधी नव्हती, त्यांना दुसऱ्या टप्प्यात ती दिली जाईल. त्यासाठी कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये वाद नाही, तसेच कोणी नाराजही नाही.
- लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप

कार्यकर्त्यांनी विचारला जाब
संतापलेल्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयात धाव घेत शहराध्यक्ष जगताप यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. ‘आम्ही गेली वीस वर्षे भाजपचे प्रामाणिकपणे काम करत आहोत; पण जुन्या कार्यकर्त्यांना एक नियम आणि नव्या लोकांसाठी दुसरा, असे म्हणत त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांसाठी सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांना बड्या हॉटेलमध्ये प्रशिक्षण आणि आम्ही मात्र कार्यकर्ते गोळा करत फिरायचे काय? गेल्या महिन्यापासून मानापमान नाट्य सुरू झाले आहे. आमचा वेळोवेळी पाणउतारा केला जातो, हे तत्काळ थांबायला हवे. भाजपमध्ये समांतर पार्टी चालविली जात आहे. आमच्यासाठी प्रोटोकॉल आणि त्यांना रान मोकळे हे चालणार नाही,’ अशा शब्दांत जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांच्या कानावर घालू, असे आश्‍वासन शहराध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com