...तरच भाजपविरोधी आघाडीत सहभाग - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - आगामी निवडणुकीत भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे; परंतु, धनगर, माळी, भटके विमुक्त आणि मुस्लिम या समाजातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येणार असतील तरच आम्ही आघाडीसाठी एकत्र येण्यास तयार आहोत, अशी भूमिका ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मांडली; अन्यथा वंचित बहुजन आघाडी या बॅनरखाली एकत्र येऊन आम्ही निवडणुका लढवू, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपविरोधी आघाडीत सर्व पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्यावर बोलताना आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "पुरोगामी पक्ष म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आमचा विरोध नाही; परंतु आमच्या काही अटी आहेत. त्या मान्य झाल्या तरच आम्ही एकत्र येऊ शकतो. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यामातून राज्यातील वंचित संघटनांना सहभागी करून आगामी काळात काम करणार आहे. भाजप सरकार विरोधात जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे.''

आमचा पेशवाईला विरोध
शरद पवार यांच्या पगडीच्या वक्तव्यावर बोलताना आंबेडकर यांनी, 'पवार यांनी फुलेंची पगडी स्वीकारली याचा आम्हाला आनंद आहे. आमचा विरोध पेशवाईला आहे. शरद पवारांना आम्ही पुरोगामी समजतो; परंतु त्यांच्या काही भूमिका या प्रतिगामी आहेत. त्या त्यांनी सोडाव्यात,'' असे मत व्यक्त केले.

..तर सरकार अल्पमतात येईल
जम्मू-काश्‍मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सरकारचे झाले तेच महाराष्ट्रातही होईल. पावसाळी अधिवेशन मुंबईत घ्यावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे, तर अधिवेशन नागपूरलाच व्हावे, यासाठी भाजप आग्रही आहे. या वादातून शिवसेनेचे सदस्य पावसाळी अधिवेशनाला गेले नाहीत, तर हे सरकार अल्पमतात येईल, असा दावा आंबेडकरांनी या वेळी एका प्रश्‍नाला उत्तर देताना केला.

वकिली हिसका दाखवणार
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना आधी नक्षलवाद्यांशी संबंध दिसला नाही. आता पोलिसांकडून तसा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पोलिस त्यांच्याच जाळ्यात अडकत आहेत. संभाजी भिडे हे आरएसएसच्या कोअर ग्रुपमधील व्यक्ती आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागल्याने ते चिडले आहेत. पी. बी. सावंत आणि बी. जी. कोळसे पाटील हे दोघे निवृत्त न्यायाधीश असल्याने पोलिस त्यांना हात लावू शकत नाहीत. त्यामुळे पोलिस आता माझ्या मागे लागले आहेत. मला चौकशीला बोलावण्याआधी मी पोलिसांना नोटीस बजावून वकिली हिसका दाखवणार आहे,'' असा इशारा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

Web Title: BJP oppose aghadi prakash ambedkar politics