भाजपमध्येही रंगणार ‘भाई-भतिजा’ वाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

पुणे - लाटेचा फायदा आपल्या नातेवाइकांना देखील मिळावा आणि घरातच सत्ता राहावी, यासाठी भाजपमधील काही नेते मंडळींनी उमेदवारीसाठी कुटुंबातील व्यक्‍ती आणि नातेवाइकांसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणेच भाजपमध्येही ‘भाई-भतिजा’ वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

पुणे - लाटेचा फायदा आपल्या नातेवाइकांना देखील मिळावा आणि घरातच सत्ता राहावी, यासाठी भाजपमधील काही नेते मंडळींनी उमेदवारीसाठी कुटुंबातील व्यक्‍ती आणि नातेवाइकांसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणेच भाजपमध्येही ‘भाई-भतिजा’ वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी नाही, अशी जाहीर भूमिका पक्षाने घेतली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पक्षाच्या निवड समितीच्या बैठकीतही हा विषय आला होता. त्या वेळी नातेवाइकांना उमेदवारी नाही, असा ठरावच करण्यात आला. परंतु लोकसभा-विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही पक्षाला चांगले यश मिळाल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यास पक्षाचे नेते अपवाद कसे ठरणार. या लाटेचा फायदा आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाइकांना व्हावा व घरातच सत्ता राहावी, यासाठी नेते मंडळी पुढे सरसावली आहे. त्यांनी आपला मुलगा, पत्नी, सुनेसह नातेवाइकांना उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाकडे आग्रह धरण्यास सुरवात केली आहे. त्यावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

पक्षाला चांगले दिवस आल्याने आधीच इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातच ‘इनकमिंग’चे प्रमाणही वाढले आहे. असे असताना नेतेमंडळींनी आप्तस्वकीयांसाठी आग्रह धरल्याने आता वाद निर्माण होऊ लागले आहेत. उमेदवारी वाटप झाल्यानंतर हा वाद किती चिघळणार, हे लवकरच कळले. परंतु या सर्व ‘बंडोबांना थंड’ करण्याची कसरत नेत्यांना करावी लागणार हे नक्की.
 

बंडाचा झेंडा
काही प्रभागात कार्यकर्त्यांनी स्वपक्षाच्या नेत्यांविरोधात, तर काही प्रभागात ‘आयात’ उमेदवारांच्या विरोधात बंड उभारण्यास सुरवात केली आहे. उमेदवारी जाहीर होण्यास काही दिवस शिल्लक असून आताच त्या विरोधात उघड बंड सुरू झाले आहे.

काही प्रमुख दावेदार ! 
सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे हे बंधू सुनील यांच्यासाठी, तर आमदार माधुरी मिसाळ या त्यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यासाठी एकाच प्रभागात इच्छुक आहेत. खासदार अनिल शिरोळे हे त्यांचा मुलगा सिद्धार्थ याच्यासाठी, आमदार भीमराव तापकीर हे मुलगा रोहन आणि पुतण्या अभिषेक यांच्यासाठी, आमदार योगेश मुळीक हे बंधू जगदीश यांच्यासाठी, आमदार योगेश टिळेकर हे बंधू चेतन किंवा आई रंजना टिळेकर यांच्यासाठी इच्छुक आहेत. 

Web Title: bjp party dispute in municipal election