भाजपने राखला गड

प्रसाद पाठक - @pprasad_sakal
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पुणे - भाजपला पर्याय म्हणून ‘पेठकरांनी’ २०१२ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारड्यात यश टाकले होते. परंतु मनसेने निराशा केल्याने मतदारांनी त्या पक्षाच्या उमेदवारांना यंदा मात्र नाकारले. युती तुटल्याने शिवसेनेसोबतच काँग्रेस, राष्ट्रवादीकडेही पाठ फिरविली. पण केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असल्याने, शहरातले स्थानिक प्रश्‍न विनाअडथळा मार्गी लागतील, याच उद्देशाने ‘निष्ठावंतांनी’ खंबीरपणे भाजपला साथ दिल्याने भाजपला पेठांमध्ये गड राखता आला आणि शनिवार पेठ-सदाशिव पेठेतून (प्रभाग क्रमांक १५) चारही ठिकाणी पक्षाचे कमळ फुलले.  

पुणे - भाजपला पर्याय म्हणून ‘पेठकरांनी’ २०१२ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारड्यात यश टाकले होते. परंतु मनसेने निराशा केल्याने मतदारांनी त्या पक्षाच्या उमेदवारांना यंदा मात्र नाकारले. युती तुटल्याने शिवसेनेसोबतच काँग्रेस, राष्ट्रवादीकडेही पाठ फिरविली. पण केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असल्याने, शहरातले स्थानिक प्रश्‍न विनाअडथळा मार्गी लागतील, याच उद्देशाने ‘निष्ठावंतांनी’ खंबीरपणे भाजपला साथ दिल्याने भाजपला पेठांमध्ये गड राखता आला आणि शनिवार पेठ-सदाशिव पेठेतून (प्रभाग क्रमांक १५) चारही ठिकाणी पक्षाचे कमळ फुलले.  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, भारतीय जनता पक्षाचा ‘निष्ठावंत मतदार’ हीच खरी पेठेतल्या ‘पारंपरिक मतदारां’ची ओळख. भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवार दिले होते. पण भाजपच्या विरोधात माजी नगरसेविका ॲड. रूपाली पाटील यांच्याव्यतिरिक्त अन्य पक्षांचा एकही उमेदवार तुल्यबळ नव्हता. मनसेने तरुणाईला संधी दिली. मात्र राजकारणात नवखे असलेले तरुण उमेदवार मतदारांवर प्रभाव पाडू शकले नाहीत. राष्ट्रवादीने क गटातून उमेदवारी दिलेल्या विद्या पोकळे मतदारांच्या फारशा परिचयाच्याही नव्हत्या. पक्षाच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढविणारे काँग्रेसचे सुरेश चव्हाण (गट अ) आणि सतीश मोहोळ (गट ड) हे देखील मते त्यांच्याकडे वळविण्यात अपयशी ठरले. शिवसेनेच्या प्रतिभा भिलारे (गट क), निरंजन दाभेकर (गट अ) आणि मयूर कडू (गट ड) निवडणूक लढले खरे, पण तेही केवळ तरुण मतदारांच्या पाठिंब्यावर, त्यामुळे त्यांच्या पदरात चार ते पाच हजारच मते पडली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोतीबाग हे शहर कार्यालय याच मतदारसंघात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेकडे येथील मतदारांनी पाठ फिरविल्यानंतर मतदानावर काय परिणाम होईल, याची धाकधूक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते आणि उमेदवारांनाही होती. पण सभेकडे पाठ फिरवूनही पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप विचारसरणीशी जुळवून घेणाऱ्या येथील मतदारांनी सुप्तपणे मोदीलाटेची पुनरावृत्ती मतपेटीतून यंदाही दाखवून दिली. एवढेच नव्हे, तर ६१ टक्‍क्‍यांहून अधिक मतदान करून सर्वाधिक मतदारांनी भाजपला एकतर्फी पाठिंबा दिल्याने, मुक्ता टिळक, हेमंत रासने, राजेश येनपुरे, ॲड. गायत्री खडके या चारही उमेदवारांना पंचवीस हजारांच्या आसपास मते मिळाली.

टिळक यांनी तर सर्वाधिक २८,१३३ मते मिळवून पुणे महानगरपालिकेत मतदारांचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचे दाखवून दिले.  

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारसरणीपासून स्वतःला कायमच दूर ठेवणारे मतदार अशीही या मतदारसंघाची ओळख आहे. तरीही या मतदारांनी मागील निवडणुकीत नवख्या मनसेला संधी देऊन पाहिले. पण मनसेला या संधीचा फायदा घेता आला नाही. माजी नगरसेविका ॲड. रूपाली पाटील यांच्या विषयीची नाराजीही मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिली. त्यांना केवळ १४,७६६ मतांवर समाधान मानावे लागले. त्यांच्या विरोधातील भाजपच्या ॲड. गायत्री खडके यांनी २६,२६२ मते मिळविली. दोघींपैकी कोणीच नको म्हणून २७७७ मतदारांनी ‘नोटा’चाही (नन्‌ ऑफ द अबोव्ह) वापर केला. अ गटात १५४६, क गटात १७७१ आणि ड गटात १६९० मतदारांनी नोटा वर बटण दाबून कोणावरही विश्‍वास दर्शविला नाही. परंतु बहुसंख्य नागरिकांमुळे भाजपचे पॅनेलच निवडून आले. मात्र निवडून आलेल्या चारही उमेदवारांनी वेळेत स्थानिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा आखायला हवा, अन्यथा हेच ‘पेठकर’ त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.

Web Title: bjp party kept the fort