आयारामांऐवजी निष्ठावंतांना संधी द्या ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे - महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आदी विविध पदांवर "आयारामां'ऐवजी भारतीय जनता पक्षातील निष्ठावंतांनाच संधी द्यावी, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे रविवारी केली. दरम्यान, निष्ठावान आणि आयाराम यांच्यातील संघर्ष भाजपमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत. 

पुणे - महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आदी विविध पदांवर "आयारामां'ऐवजी भारतीय जनता पक्षातील निष्ठावंतांनाच संधी द्यावी, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे रविवारी केली. दरम्यान, निष्ठावान आणि आयाराम यांच्यातील संघर्ष भाजपमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत. 

स्थायी समितीचे सदस्य, सभागृह नेते, महापालिकेतील विविध समित्यांची अध्यक्ष आणि सदस्यपदे, पीएमपी संचालक, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद, स्मार्ट सिटीच्या कंपनीचे संचालक आदी पदांसाठी येत्या चार- आठ दिवसांत नावे निश्‍चित होणार आहेत, त्यामुळे नगरसेवकांनी नेत्यांकडे लॉबिंग करण्यास सुरवात केली आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये आले आणि उमेदवारी मिळवून विजयी झाले, असे सुमारे 30 नगरसेवक आहेत, त्यांनीही विविध माध्यमांद्वारे महापालिकेतील सत्तेची पदे मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली आहे, त्यामुळे पक्षाचे निष्ठावान नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. पक्षामध्ये दुसऱ्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकांना पदे देताना प्राधान्य द्यावे, कारण गेल्या निवडणुकीत त्यांना कोणतेही पद मिळालेले नाही. तसेच, केवळ नगरसेवकपद मिळविण्यासाठी पक्षात आलेल्यांऐवजी मूळच्या भाजपच्या नगरसेवकांनाच संधी द्यावी, अशी मागणी दोन- तीन शिष्टमंडळांनी गेल्या दोन दिवसांत बापट यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याने बापट यांनी त्यांच्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिल्याचे काही नगरसेवकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. दरम्यान, महापौरपदाच्या शर्यतीत प्रा. ज्योस्त्ना एकबोटे, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मुरली मोहोळ, स्वीकृत सदस्यासाठी प्रमोद कोंढरे आदींचीही नावे आता चर्चेत आली आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठींकडून दोन दिवसांत सूचना मिळतील आणि त्यानुसार पुढील कार्यवाही होईल, असे पक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

Web Title: bjp politics in pmc