गोंधळात गोंधळ!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिकेच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक कार्यकारिणीने भारतीय जनता पक्षाशी युती करून उभ्या केलेल्या आठ जागांवरील उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या राज्य शाखेने नामंजूर केलेच; पण तेवढेच करून राज्य शाखा थांबली नाही, तर ‘अधिकृत’ रिपब्लिकनचे उमेदवार म्हणून इतर तीन जणांना पुरस्कृतही केले आहे. त्यामुळे भाजप-रिपब्लिकन युतीच्या आधीच्या गोंधळात आणखी भर पडली आहे. 

तीन उमेदवारांना पुरस्कृत करण्याच्या या निर्णयास पक्षाचे राज्य सरचिटणीस राजा सरोदे यांची मान्यता आहे. पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीच तशी सूचना दिली असल्याचे सांगण्यात आले. 

रिपब्लिकनच्या स्थानिक नेत्यांनी केलेले जागावाटप आणि कमळ चिन्ह घेण्याचा प्रकार रिपब्लिकनमधील नाराज गटाने पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. त्यामुळे सरोदे यांनी शहर कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ नाराज असलेल्या मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना पुरस्कृत करण्याचाही निर्णय सरोदे यांनी घेतला. शहर युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी सुचविलेल्या तीन उमेदवारांना पुरस्कृत करत असल्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये धानोरी-कळसमधून (प्रभाग १) नलिनी राजेंद्र कांबळे, चंदननगर-खराडीमधून (प्रभाग ४) प्रदीप साठे आणि रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर (प्रभाग ११) मधून सुहास गजरमल या तीन अपक्ष उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाने पुरस्कृत केले आहे. भाजप-रिपब्लिकनची महापालिका निवडणुकीत युती नाही, असे सांगत रिपब्लिकनने संबंधित उमेदवारांना पुरस्कृत केले आहे.

भाजपची कोंडी?
प्रभाग एक, चार व अकरामध्ये भाजपचे उमेदवार असतानाही तेथे ‘रिपब्लिकन’ पुरस्कृत उमेदवार देऊन भाजपची कोंडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

‘रिपब्लिकन’च्या या भूमिकेमुळे भाजपला संबंधित प्रभागात फटका बसण्याचीही शक्‍यता आहे; मात्र एकीकडे भाजपकडून आठवले मंत्रिपद भूषवित असताना दुसरीकडे त्यांचाच पक्ष भाजपविरुद्ध उमेदवार उभे करत असल्याच्या दुहेरी भूमिकेबद्दलही संभ्रम निर्माण झाला आहे. आठवले यांनी आत्तापर्यंत यासंदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: bjp & rpi no communication