भाजपच्या निवड मंडळात शंभर जागांवर एकमत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - महापालिकेच्या 41 प्रभागांतील शंभर जागांवर भाजपच्या निवड मंडळात जवळपास एकमत झाले असल्याचे बोलले जात आहे. उर्वरित जागांवरील तिढा कायम असल्याने त्या जागांचा निर्णय राज्य पातळीवर सोपविण्यात आला आहे. एकमत झालेल्या जागांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

पुणे - महापालिकेच्या 41 प्रभागांतील शंभर जागांवर भाजपच्या निवड मंडळात जवळपास एकमत झाले असल्याचे बोलले जात आहे. उर्वरित जागांवरील तिढा कायम असल्याने त्या जागांचा निर्णय राज्य पातळीवर सोपविण्यात आला आहे. एकमत झालेल्या जागांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती होत नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून निवड मंडळाची बैठक सुरू आहे. बुधवारीही रात्री उशिरापर्यंत बाणेर येथील एका हॉटेलमध्ये ही बैठक सुरू होती. या चर्चेदरम्यान 41 प्रभागातील जवळपास शंभर जागांवर निवड मंडळातील नेत्यांचे एकमत झाले, उर्वरित जागांबाबत एकमत होत नसल्यामुळे त्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्याचे ठरले आहे. पक्षाकडून पहिली प्राथमिक यादी तयार झाली असून ती मान्यतेसाठी राज्य निवड मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. थोड्याफार प्रमाणात त्यामध्ये बदल होऊ शकतो. मात्र, येत्या एक-दोन दिवसांत ती यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले.

प्रत्येक प्रभागात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घातले असून निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष लावण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांमधील धाकधूक वाढली असून यादीत आपले नाव येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

काही मान्यवरांनाही फटका?
सर्वच प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच अद्याप इनकमिंग सुरू आहे. या स्पर्धेचा फटका पक्षातील काही मान्यवर नगरसेवकांना बसण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. कसब्यासह काही मतदारसंघातील विद्यमान नगरसेवक यांना थांबण्याची सूचना करण्यात आली आहे. तर काही मान्यवरांसमोर पत्नीचा पर्याय पुढे केला आहे. त्यामुळे काही प्रभागात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. पक्षात उलट-सुलट चर्चेला वेग आला असून नेमका कोणाला झटका बसणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: BJP Selection Board 100 seat consensus