भाजप-शिवसेना युती विधानसभेसाठी कायम : रावसाहेब दानवे

danve.jpg
danve.jpg

पिंपरी : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता. 10) केला.
 
शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे आणि खासदार गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, योगेश टिळेकर, महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडेगिरी, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे उपस्थित होते. दानवे यांच्या हस्ते भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. 

ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण जेवढे काम केले, तितकेच काम आपल्याला राज्यात पुन्हा सरकार आणण्यासाठी करायचे आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष बहुमतात येणार नाही, असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र, देशातील मतदारांनी कुणावरही भरवसा न ठेवत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना मतदान केले. राज्यात 42 ठिकाणी युतीचे उमेदवार विजयी झाले, त्याठिकाणी नरेंद्र मोदी हेच उमेदवार होते. बाकी कोणीच नव्हते.'' लोकसभा निवडणुकीमध्ये 228 विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळेस मी म्हणणारे आता बिळात जाऊन बसले आहेत, त्याचा आम्हाला शोध लागत नसल्याचा टोला त्यांनी या वेळी लगावला. 
आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचे नाव आणि सरकारने केलेले काम यामुळे मतदारांनी पुन्हा सरकार निवडून दिले आहे. काँग्रेसने आतापर्यंत आम्हीच सरकार चालवू शकतो, असा गैरसमज निर्माण केला होता. काँग्रेस पक्षाला अजून अध्यक्ष सापडेना अशी परिस्थिती झाली आहे. भारतीय जनता पक्ष हा परिवार म्हणून काम करणारा पक्ष असून काँग्रेस पक्ष हा परिवाराची पार्टी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, पक्षाचे काम करत राहा, कोणासाठी कधी संधी येईल, हे सांगता येणार नाही. आपल्याला संधीच मिळणार नाही, असे कार्यकर्त्यांनी समजू नये. पक्षाला चांगल्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचे दानवे या वेळी म्हणाले. 

सामान्य माणसांपर्यंत हा पक्ष जाऊन पोचला आहे. आसाम, नागालॅन्ड, त्रिपुरा या राज्यांत पक्षाचा विस्तार होत आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेस पक्ष शिल्लक राहणार नाही. संघटनेच्या भरवशावर पक्ष वाढू आणि चालू शकतो. पक्षात काम करत असताना सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होतील असे नाही, त्यासाठी संयम ठेवणे आवश्‍यक असल्याचा सल्ला दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

बापटांची फटकेबाजी अन्‌ हशा 
खास पुणेरी स्टाइलमध्ये फटकेबाजी करणाऱ्या खासदार गिरीश बापट यांनी पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे नेते कसे आहेत, याची उदाहरणे देत सभागृहात हशा पिकवला. पिंपरी-चिंचवडमधील वातावरण समजावून घेण्यासाठी मला साडेचार वर्षे लागल्याचे सांगतानाच आधीच्या पालकमंत्र्यांना घाबरायला व्हायचे. मात्र, आपण पालकमंत्री म्हणून काम करताना मालकमंत्री म्हणून वागलो नाही. दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी पैसे देऊन लोक जमविल्याची चर्चा रंगली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com