भाजप-शिवसेनेच्या त्रासामुळे कंत्राटदार पळालाः अजित पवार

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 5 जून 2018

'लोकसभा निवडणुकीत आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराला कमी मतदान होते; तर विधानसभेला उच्चांकी मतदान राष्ट्रवादीला होते, असा फरक करू नका. विकास कामांचा वेग कायम ठेवण्यासाठी लोकसभेला आंबेगावमधून राष्ट्रवादीला लीड मिळालेच पाहिजे.''
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

मंचर: "पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशी, राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव येथील वाहतूक कोंडीने जनता त्रस्त झाली आहे. बाह्यवळणाची काम करणारा कंत्राटदार भाजप-शिवसेनेच्या त्रासामुळे पळून गेला आहे. शेतकरी, कामगार, व्यापारी वर्गातही कमालीची नाराजी आहे. हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे,'' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

मंचर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी अजित पवार बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, पोपटराव गावडे, देवदत्त निकम, ऍड. प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, अरुणा थोरात, उषा कानडे आदी या वेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, 'शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना कृषीचा विकासदर 4.01 टक्के सलग दहा वर्षे होता. सध्या विकासदर 2.07 टक्के आहे. पवार यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व आमदार पाशा पाटील यांच्या पोटात दुखायला लागले. तुमची कुवत काय, तुमचा जीव किती, कोणाला काय बोलताय, हे त्यांना समजत नाही. गेली 15 वर्षे पुणे- नाशिक रेल्वे सुरू होणार, असे ऐकतोय; पण अजून रेल्वे सुरू नाही. विमानतळही या भागातून गेले आहे. त्याचा परिणाम परिसर विकासावर होणार आहे.''

वळसे पाटील म्हणाले, 'देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. समविचारी पक्ष एकत्र येत आहेत. शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे केंद्रात व राज्यात परिवर्तन होणार, हे स्पष्ट झाले आहे. वृत्तपत्र व इलेक्‍ट्रॉनिक माध्यमावर दबाव आणला जात आहे.''

ऍड. सूर्यकांत पलांडे, ऍड. भगवान साळुंके, विष्णू हिंगे, सुभाष उमाप, सुषमा शिंदे, सविता बगाटे, रमेश खिलारी, नीलेश थोरात यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी आभार मानले. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: bjp shiv Sena distress caused by contractor says ajit pawar