‘वंचित’मुळे भाजपचा किंचित विजय | Election Results 2019

ब्रिजमोहन पाटील
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

भाजपची प्रचंड यंत्रणा, फोडाफोडीचे राजकारण आणि डझनभर नगरसेवकांचे पाठबळ असतानाही भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांच्याशी विजयासाठी झुंजावे लागले.

पुणे - भाजपची प्रचंड यंत्रणा, फोडाफोडीचे राजकारण आणि डझनभर नगरसेवकांचे पाठबळ असतानाही भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांच्याशी विजयासाठी झुंजावे लागले. पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून कोण जिंकणार, याची उत्कंठा कायम होती. अखेर भाजपला भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता येथे शेवटच्या फेरीत झालेल्या एकगठ्ठा मतदानामुळे शिरोळे यांचा ५ हजार १२४ मतांनी विजय झाला. या विजयात वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरली.

 भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढत असलेल्या या मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात होते. लोकसभेला भाजपला शिवाजीनगरमधून २९ हजारांचे मताधिक्‍य असले तरी, त्याचा येथे काही फायदा झाला नाही. खडकी, बोपोडी या भागातून बहिरट यांनी एक हजार मतांची आघाडी घेतली. वंचितलाही येथे चांगले मतदान झाल्याने व भाजपने फोडाफोडी करून काँग्रेसच्या मतपेटीला सुरुंग लावल्याचा फायदा येथे शिरोळे  यांना झाला. 

औंध व औंध रस्ता, गणेशखिंड रस्ता, पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रस्ता, मुळा रस्ता, येरवडा, खैरेवाडी, न.ता.वाडी भागात शिरोळे यांना बहिरट यांच्यापेक्षा जास्त मते मिळत होती. त्यामुळे १३व्या फेरीपर्यंत शिरोळे यांनी ५ हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली. गोखलेनगर, पांडवनगर, जनवाडी येथे १५, १६, १७ आणि १८ या चार फेऱ्यांमध्ये शिरोळेंना मागे टाकत बहिरट १७३ मतांनी पुढे आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. येथे काँग्रेसला जास्त मते मिळाली, असली तरी वंचितच्या उमेदवारानेही येथे सुमारे तीन हजार मते घेतल्याने मतांची आघाडी रोखली गेली. 

१९ व्या फेरीत सेनापती बापट रस्ता, आपटे रस्ता येथून १ हजार १३८ आणि शेवटच्या २० व्या फेरीत भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता येथून ४ हजार ११ मतांची आघाडी शिरोळे यांना मिळाली. त्यामुळे पराभवाच्या छायेत गेलेले भाजप कार्यकर्ते बाहेर आले आणि विजयाची घोषणाबाजी सुरू केली. 

शिरोळे यांना पोस्टलचे १४७ तर बहिरट यांना १६३ मतदान मिळाले. तर तीन ‘ईव्हीएम’ सुरू न झाल्याने त्यांच्या ‘व्हीव्हीपॅट’च्या चिठ्ठ्या मोजण्यात आल्या. यानंतर शिरोळे यांचा ५ हजार १२४ मतांनी विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले. मतदारसंघात २ हजार ३९० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला, त्यापैकी ८ पोस्टल आहेत.

ही निवडणूक अटीतटीची झाली. कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट आणि मतदारांनी दाखविलेला विश्‍वास यामुळे माझा विजय झाला आहे. पुढील काळात मतदारसंघातील प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘निर्धारनाम्याची’ अंमलबजावणी करण्यावर माझा  भर आहे.
- सिद्धार्थ शिरोळे, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP slight victory in shivajinagar constituency