भाजपच्या नव्या पर्वाला सुरवात

- मीनाक्षी गुरव
रविवार, 12 मार्च 2017

प्रभाग ९ - बाणेर-बालेवाडी-पाषाण

प्रभाग ९ - बाणेर-बालेवाडी-पाषाण

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रस्थापित नगरसेवक... अन्‌ दुसरीकडे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, हेच बाणेर-बालेवाडी-पाषाण (क्र. ९) प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मात्र, अशा अटीतटीच्या सामन्यातही भाजपच्या उमेदवारांनी नव्या उमेदीने एकत्रित प्रचार केल्याचे दिसून आले. रखडलेल्या विकासकामांचा मांडलेला आलेख, मुख्यमंत्र्यांची सभा आणि नियोजित प्रचारनीतीमुळेच या प्रभागात वर्चस्व सिद्ध करण्यात भाजपला यश आले. अर्थात, प्रभागातील गट ड मधील जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असले तरी, प्रभागावर भाजपचेच वर्चस्व राहिले. 

या प्रभागातील भाजपच्या स्वप्नाली सायकर (गट अ), ज्योती कळमकर (गट ब) आणि अमोल बालवडकर (गट क) हे उमेदवार विजयी झाले आहेत. गट ड मधून भाजपचे राहुल कोकाटे यांनी निवडणूक लढविली, अर्थात त्यांना अपयश आले असले तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे यांना टक्करीची लढत दिली. अनेक वर्षांपासून या भागात आपला तळ ठोकून असलेल्या चांदेरे यांचा केवळ १२६ मतांनी विजय झाला. भाजपच्या लाटेत चांदेरे यांनी मिळवलेला विजयही महत्त्वपूर्ण मानला जातो. या प्रभागात राष्ट्रवादीकडून विद्या बालवडकर, नीलिमा सुतार, प्रमोद निम्हण यांनी निवडणूक लढविली. तर शिवसेनेकडून नीता रणपिसे, रोहिणी धनकुडे, संजय निम्हण, चंद्रशेखर (ऊर्फ सनी) निम्हण हे निवडणुकीच्या रिंगणात होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गट अ मधून शिवांजली दळवी आणि गट ब मधून बेबीताई निम्हण यांना उमेदवारी दिली होती. त्याशिवाय काँग्रेसने गट क मधून रोहित धेंडे हा एकमेव उमेदवार रिंगणात उतरविला होता. 

राष्ट्रवादीकडे आजी-माजी नगरसेवक आणि जुन्या कार्यकर्त्यांची दमदार फळी होती; परंतु त्यांचा प्रभाव फारसा पडला नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याचे दिसून आले. शिवसेनेनेही या प्रभागात मोठ्या ताकदीने उमेदवार उभे केले होते; परंतु त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांचे चिरंजीव चंद्रशेखर (ऊर्फ सनी) निम्हण हे निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र त्यांना अपयश पचवावे लागले. एकत्रित प्रचाराबरोबर भाजपकडे सक्रिय असणारी युवकांची मोठी फौज, महिलांचा सहभाग, नियोजनबद्ध प्रचारामुळेच या प्रभागात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित होण्यास मदत झाली.

Web Title: bjp start new season