भाजपतील नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

राष्ट्रवादीतून भाजपत येणाऱ्यांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांना घालणार साकडे

पिंपरी - भारतीय जनता पक्षामध्ये नव्याने दाखल होणाऱ्या ‘आयारामां’च्या वाढत्या संख्येमुळे या पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दररोज ‘हा’ ना ‘तो’ कार्यकर्ता भाजपमध्ये दाखल होत आहे. त्यामुळे पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर असून, यातील अनेक जण राष्ट्रवादी व शिवसेनेच्या संपर्कात आहेत; पण निर्णय घेण्याअगोदर हे कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहेत.

निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधी राष्ट्रवादीचे अनेक मोहरे भाजपमध्ये दाखल झाले. भोसरीचे आमदार महेश लांडगे असो, की काल-परवा प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते आझम पानसरे असो, त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक समर्थक, विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांची डोकेदुखी वाढली आहे. या नव्यांपैकी अनेक जण भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आपल्याला संधी मिळते की नाही, अशी शंका जुन्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे.

महापालिकेच्या मावळत्या सभागृहात भाजपचे जेमतेम तीन सदस्य होते; परंतु या वेळी पहिल्यांदाच पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले आहे. पालिकेच्या कारभारातील भ्रष्टाचारामुळे राष्ट्रवादीची बदनामी झाली. त्याचा विपरीत परिणाम होऊन पक्षाला गळती लागली. या गळतीचा पुरेपूर फायदा उठवत भाजपने राष्ट्रवादीला निवडणुकीत नामोहरम करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील मात्तबर लोकांनी पक्षात प्रवेश देण्याचा सपाटा सुरू झाला आहे.

पक्षप्रवेशाच्या धडाक्‍यामुळे जुने निष्ठावंत कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. कारण, ज्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तो निवडणुकीवर डोळा ठेवूनच केला आहे. त्यामुळे आपली संधी हुकणार, अशी धारणा या कार्यकर्त्यांची झाली आहे. २०१२ मध्ये २५ ते ३० उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर, तर काही अल्पफरकाने पराभूत झालेले आहेत. अशांना या वेळी निवडून येण्याची संधी आहे. त्यामुळे उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत; पण नव्या लोकांना उमेदवारी दिल्यास आपल्यावर अन्याय होऊ शकतो, अशी या कार्यकर्त्यांची धारणा झाली आहे. 

वेगळा विचार करावा लागणार
गेली पंचवीस वर्षे आपण भाजपमध्ये राहून पक्षाची निष्ठेने सेवा केली आणि आता निवडून येण्याची संधी असताना ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार असेल, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराच यानिमित्ताने जुन्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. काही जुने कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या संपर्कात असून, निर्णय घेण्याअगोदर ते मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना भेटणार असल्याचे एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: bjp upset member contact with NCP